• Wed. Apr 24th, 2024

रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य:आता मात्र हद्द झाली…

Byjantaadmin

Nov 25, 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद धुमसत असतानाच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी एक अतिशय वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केलेय. महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण माझ्यासारखे त्यांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात, असे वक्तव्य त्यांनी केलेय.

ठाण्यातील हायलँड मैदानात रामदेव बाबा यांनी योगाचे धडे दिले. यावेळीच त्यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला हजोराच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

काय होता कार्यक्रम?

ठाण्यात पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान तर्फे आज मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. यावेळी रामदेव बाबांनी योगाचे धडे तर दिले. यावेळी दीपाली सय्यद, आमदार रवी राणा यांनीही मंचावर हजेरी लावली.

काय म्हणाले बाबा?

रामदेव बाबा म्हणाले की, अमृता फडणवीस यांना व्यायमाचा इतका चार्म आहे की, त्यांना इतकी आवडय की, त्या शंभर वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खूप तोलून-मोजून खातात. आनंदी राहतात. जेव्हा पाहावे मुलासारख्या हासत राहतात. जसे हास्य अमृताजींच्या चेहऱ्यावर असते, तसेच हास्य मी तुमच्या चेहऱ्यावर पाहू इच्छितो.

अन् जीभ घसरली…

रामदेव बाबा पुढे म्हणाले की, तुम्ही खूप नशिबवान आहात. खूप चांगल्या दिसताय. समोरच्याला साडी नेसायची संधी मिळाली. कुणाला ती मिळालीही नाही. खरे तर तुम्ही साडी नेसल्यानंतरही चांगल्या दिसता. सलवार सूटमध्येही छान दिसतात. माझ्यासारखे महिलांनी काही नाही घातले तरी त्या छान दिसतात, असे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी फडणीस आणि शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. या दोघांनी इतिहास रचल्याचे ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यापूर्वी संभाजी भिडे गुरुजी यांनी महिला पत्रकाराला टिकली लावली, तरच तुझ्याशी बोलतो, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केलेय. एकीकडे राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केल्याने राज्य ढवळून निघालेय. त्यात रामदेव बाबांच्या वक्तव्याने पुन्हा वातावरण तापण्याची शक्यताय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *