• Thu. Apr 25th, 2024

लातूर जिल्ह्यात लॉन टेनिसचे उत्कृष्ट खेळाडू घडावेत-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

Byjantaadmin

Dec 30, 2022

लातूर जिल्ह्यात लॉन टेनिसचे उत्कृष्ट खेळाडू घडावेत-जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

▪️राज्यस्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन
▪️राज्यातील आठ विभागातून 80 खेळाडूंचा सहभाग

लातूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यात लॉन टेनिसचे उत्कृष्ट खेळाडू घडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या खेळासाठी चांगल्या दर्जाचे दोन कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सुविधेचा लाभ जिल्ह्यातील लॉन टेनिस खेळाडूंनी घेवून आपले क्रीडा कौशल्य विकसित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे केले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातीने आयोजित राज्यस्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मोईज खान, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, माजी क्रिकेटपटू संगीत रंदाळे, सोफ्टबॉल क्रीडा संघटनेचे सचिव डी. डी. पाटील, लॉन टेनिस क्रीडा संघटनेचे सचिव एम. अहमद यावेळी उपस्थित होते.

लॉन टेनिस हा अतिशय चांगला क्रीडा प्रकार असून यामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी प्रयत्न करावेत. जिल्हा क्रीडा संकुलात या खेळाचे दोन कोर्ट उपलब्ध असून पालकांनी आपल्या मुलांना या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. कोविड-19 च्या दोन वर्षानंतर शालेय क्रीडा स्पर्धांचे व्यापक प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. लातूर येथे होत असलेल्या राज्यस्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धेमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात चांगले खेळाडू घडावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातही जास्तीत जास्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना संधी देण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

लॉन टेनिस क्रीडा प्रकारातील खेळाडूंना चांगली संधी असून लातूर जिल्ह्यातील खेळाडूंनी या खेळात यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले. तसेच प्रत्येक स्पर्धेत हार-जीत होत असते, मात्र त्यामुळे खचून न जाता नव्या जोमाने तयारी करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असते, असे ते यावेळी म्हणाले. राज्यस्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धेत सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी अतिशय मनापासून खेळावे. तसेच अपयश आल्यास त्याची कारणे शोधून पुढील स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरून यश संपादन करावे, असे आयुक्त श्री. मनोहरे यावेळी म्हणाले.

प्रदीर्घ कालावधीनंतर शालेय स्पर्धांचे आयोजन होत असून यामध्ये खेळाडूंचाही मोठ्या प्रमाणात सहभाग मिळत आहे. राज्यात चांगले खेळाडू घडावेत, यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून पुणे येथे 2 ते 12 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे क्रीडा उपसंचालक श्री. मोरे यांनी सांगितले.

प्रास्ताविकामध्ये श्री. लकडे यांनी राज्यस्तर शालेय लॉन टेनिस स्पर्धा आयोजनाची माहिती दिली. राज्यातील आठ विभागातील 17 वर्षांखालील 40 मुले आणि 40 मुली या स्पर्धेत सहभागी झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात यापुढेही विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच जिल्ह्यात लवकरच राज्यस्तरीय शिवछत्रपती व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित खेळाडूंना स्पर्धेच्या अनुषंगाने शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पंच बाळासाहेब चाकूरकर यांनी केले, क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *