• Sat. Apr 20th, 2024

मी तुम्हाला लिहून देतो की मध्य प्रदेशात…”, राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले…

Byjantaadmin

Dec 31, 2022

नवी दिल्ली:-भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून देशात भ्रमंती करत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. शनिवारी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारत जोडो यात्रेसंदर्भात बोलताना राहुल गांधींनी भाजपाच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. शिवाय, भारत जोडो यात्रेच्या यशाविषयी राहुल गांधींनी मोठा दावा केला आहे. मध्य प्रदेशमधील यात्रेच्या अनुभवासंदर्भात राहुल गांधी यावेळी बोलत होते.

यावेळी खोचक टोला लगावताना राहुल गांधींनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलं. “भाजपाने माझ्यावर आक्रमकपणे टीका करावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या या टीकेमुळे काँग्रेस पक्षाला आपली विचारधारा समजण्यास मदत होईल. माझ्यावर जेवढी टीका होईल, तेवढा काँग्रेस पक्षाला फायदा होईल. त्यामुळे एकप्रकारे मी भाजपाला माझा गुरू मानत असून त्यांच्यामुळेच मला आयुष्यात काय करू नये, याची शिकवण मिळते”, असं राहुल गांधी म्हणाले

“टी-शर्टवर एवढा आक्षेप का?”

यावेळी बोलताना राहुल गांधींनी त्यांच्या टी-शर्ट घालण्यावरून टीका करणाऱ्या भाजपाला सवाल केला. दिल्लीच्या थंडीतही राहुल गांधी टी-शर्टवर फिरत असल्यावरून भाजपाने खोचक टीका केली होती. त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “मला एक कळत नाही, माझ्या टी शर्टवर एवढा आक्षेप का घेतला जातो? एवढी चर्चा का केली जाते आहे. या टी-शर्टमध्ये एवढं आक्षेप घेण्यासारखं काय आहे? इथे कुणीही टी शर्ट घातलेला नाही का? तुम्हाला काय वाटतं मी स्वेटर घालू? त्यापेक्षा मी एक काम करतो भारत जोडो यात्रा संपल्यानंतर मी एक व्हिडिओ तयार करतो. त्यात मी हे सांगेन की टी-शर्ट घालून कसं चालतात. थंडी कशी कमी करतात? तेपण मी सांगेन.”

दरम्यान, यावेळी राहुल गांधींनी मध्य प्रदेशबाबत मोठं विधान केलं. “मी तुम्हाला एक गोष्ट आत्ता लिहून देतो. काँग्रेस मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये बहुमत आणणार. भाजप तिथे दिसणारही नाही. मी गॅरंटीने सांगतो. तुम्ही हे लिहून घ्या आणि तेव्हा मला सांगा. मध्य प्रदेशमध्ये भाजपा दिसणारही नाही यात काहीच शंका नाही. मी म्हटलं होतं की महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पण मध्य प्रदेशमध्ये तर सगळं वातावरणच बदललंय. तिथे वादळ आलंय. तिथे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की भाजपानं पैसे देऊन सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे आख्खा मध्य प्रदेश रागात आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *