• Mon. Oct 2nd, 2023

स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Byjantaadmin

Sep 30, 2022

मुंबई, : स्वातंत्र्यसैनिकांनी देशाप्रती केलेल्या त्यागाची जाणीव असून त्यांच्या आणि कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही देतानाच शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंत्रालयात आज स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, सचिव सुमंत भांगे आदी यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यासाठी प्राधान्य कसे देता येईल, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करावी. स्वातंत्र्यसैनिकांना सध्या मिळत असलेल्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सध्या सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. राज्यात विविध ठिकाणी असलेल्या २०० हून अधिक हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती, सुशोभीकरण करण्यात यावे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *