• Sat. Apr 20th, 2024

मान्सून संपला? ऑक्टोबर हीट सुरू:तापमान सरासरीपेक्षा एक अंशाने वाढले

Byjantaadmin

Oct 3, 2022

मान्सून संपला असून आता ऑक्टोबर हीटला सुरुवात झाली आहे. रविवारी कमाल तापमान सरासरीपेक्षा १ अंशाने वाढून ३१.८ अंश सेल्सियसवर गेल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. तापमान वाढ आणि आर्द्रताही ५७ ते ७६ टक्के होती. त्यामुळे दुपारच्या सत्रात उन्हाचे चटके बसत आहेत. कर्णपुरा यात्रेतील हजारो भाविक उन्हाच्या काहिलीने घामाघूम झाल्याचे दिसून आले.

ऑक्टोबर हीट समुद्रावरून बाष्प, उत्तरेतील थंड वारे खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आकाशात ढग घोंगावतील. तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. आठवडाभरात पाऊस पडण्यास सुरुवात होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

दोन दिवस अगोदरच तापमानात वाढ : २८ सप्टेंबरपर्यंत कमाल तापमान ३० अंशांवर होते. २९ सप्टेंबर रोजी आकाश निरभ्र राहिले व सूर्य चांगलाच तळपला. परिणामी एकाच दिवसात ३ अंशांनी तापमानात वाढ झाली. ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबरला पारा ३२ अंशांवर होता. आजही तापमान ३१.८ अंशांवर आहे. त्यामुळे बाष्प खेचून आकाशात ढगांची गर्दी होत आहे. उष्णता व आर्द्रतेमुळे उकाडा जाणवतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *