• Fri. Apr 19th, 2024

राहुल गांधीने धो-धो पावसात दिलं भाषण, ‘भारत जोडो’ यात्रेतील व्हिडीओ प्रचंड वायरल

Byjantaadmin

Oct 3, 2022

मुंबई  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 साली साताऱ्यात मुसळधार पावसात केलेलं भाषण आजही सर्वांना आठवत असेल. या भाषणानंतर जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. 2019 च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीआधी पवारांनी मुसळधार पावसात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्याची साद मतदारांना घातली होती. यानंतर आता तीन वर्षांनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधींनीही मुसळधार पावसात भाषण करत या आठवणी ताज्या केल्या.

भाजपशासित कर्नाटकात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला तीन दिवस झाले आहेत. रविवारी राहुल गांधी यांनी येथील नंजनगुड येथील प्रसिद्ध प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यानंतर सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधित केलं. यादरम्यान मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, राहुल गांधी यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. इथे त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. यानंतर त्यांनी पावसातच कार्यकर्त्यांचीही भेट घेतली. पावसात राहुल गांधींनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते शेअर करत आहेत.

व्हिडिओमध्ये राहुल गांधी पावसात रॅलीला संबोधित करताना दिसत आहेत. ज्यामध्ये ते सांगत आहेत की भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहोचली आहे. नदीसारखा प्रवास कन्याकुमारी ते काश्मीर असा होईल. या नदीत तुम्हाला हिंसा, द्वेष दिसणार नाही. फक्त प्रेम आणि बंधुभाव दिसतील. हा प्रवास थांबणार नाही. आता बघा, पाऊस येतोय, पण पाऊसही हा प्रवास थांबवू शकला नाही. उष्णतेचं वादळ हा प्रवास थांबवू शकणार नाही. देशात द्वेष पसरवणाऱ्या भाजप आणि आरएसएसच्या विरोधात उभं राहणं हा या यात्रेचा उद्देश आहे, असं ते म्हणाले

राहुल गांधींनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिलं की, “आम्हाला भारताला एकत्र करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेला कोणीही रोखू शकत नाही.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *