• Sat. Apr 20th, 2024

आज जागतिक प्राणी दिन

Byjantaadmin

Oct 4, 2022

आज ४ ऑक्टोबर जागतिक प्राणी दिन

४ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक प्राणी दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे अनेक प्रकारे सांगितले आहे. परंतु, गेल्या काही दशकांत आपण त्यापासून दूर जाऊ लागलो आहोत आणि हे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त आपल्याकडेच नाही; तर जगात अनेक ठिकाणी (सर्व प्रकारच्या) प्राणीमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. ही परिस्थिती बदलून सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो.

*उद्देश* :

* प्राणी आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचा सन्मान म्हणून.
* पशु-पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाचे निकष आधुनिक घडामोडींना अनुरूप बनवणे. (प्राणी संरक्षणाचे कायदे काळ बदलतो तसे जुने बनत जातात. अनेक शिकारी आणि तस्कर या कायद्यांत पळवाटा शोधतात. त्यामुळे असे कायदे काळाला सुसंगत बनवणे).
* प्राण्यांचे कल्याण व्हावे असे वाटणाऱ्या संघटना, संस्था जगभरात आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. त्यांच्यात समन्वय निर्माण करणे.(एकेकट्याने काम करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करणे जास्त परिणामकारक).

काही पाळीव प्राण्यांना आपण अतिशय चांगले वागवतो तर काहींना दिवसभरात खायलाही मिळत नाही ही समस्या सोडविण्यासाठी विविध कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. लहान-मोठ्या, पाळीव-भटक्या अशा सर्व प्राणीमात्रांचा यांमध्ये समावेश होतो.

खरे तर माणूस आणि इतर प्राण्यांची मैत्री जुनीच आहे, परंतु हे संबध आता अनेक कारणांनी ताणले जाऊ लागले आहेत. जंगलातील प्राण्यांचा चोरटा व्यापार, प्राण्यांवर प्रयोग करणे, त्यांना खाणेपिणे न देणे, कमी जागेत किंवा सतत बांधून ठेवणे, त्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्याकडून नको तितके काम करून घेणे, जिवंत प्राण्यांचेही अवयव काढणे, प्राण्यांपासून विविध वस्तू बनविणे, झुंज लावून एकाचा जीव जाईपर्यंत ती चालवणे, जिवंत प्राणी खाणे वा शिजवणे; अशा आणि इतरही अनेक प्रकारांनी माणसे प्राण्यांचा छळ करत असतात. या मुक्या पशुपक्ष्यांची भाषाही आपल्याला समजत नसल्याने त्यांच्या समस्यांत भरच पडते. याविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर सामुदायिक आवाज उठवण्याचे आणि काही कृती करण्याचे महत्त्व ‘वर्ल्ड अॅनिमल डे’ ला सांगितले जाते. या निमित्ताने आपण प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तू (हस्तदंती मूर्ती, कातडी बॅग्ज, वा पर्सेस इ.) खरेदी न करण्याचे ठरवून पशुपक्ष्यांना मिळणाऱ्या क्रूर वागणुकीस अटकाव करावा.

१९३१ साली फ्लोरेंस, इटली येथे पर्यावरण शास्त्रज्ञांची एक परिषद भरली होती. त्यात धोक्यात आलेल्या (नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या) प्राण्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे १९३१ या वर्षापासून जागतिक प्राणी दिन साजरा केला जात आहे.

असिसीचे संत फ्रान्सिस हे प्राण्यांवर अतिशय प्रेम करीत. ४ ऑक्टोबर हा त्यांचा ‘उत्सव दिन’ (Feast Day) म्हणून त्यांच्या सन्मानार्थ ४ ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो.

संकलन व संकल्पना
मौजन ए. आर.
साभार
नेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *