• Wed. May 31st, 2023

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Byjantaadmin

May 25, 2023

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आपच्या नेत्यांनी गुरुवारी (२५ मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यानंतर शरद पवारांनी या भेटीवर बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी भेटीचं कारण सांगतानाच दिल्ली सरकारच्या अधिकारांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचा केजरीवाल सरकारला पाठिंबा जाहीर केला. तसेच इतर राज्यातून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही नमूद केलं.

Sharad Pawar Arvind Kejriwal AAP

शरद पवार म्हणाले, “आजची पत्रकार परिषद महत्त्वाची आहे. देशासमोर एक नवा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न केवळ दिल्लीचा नाही, तर संसदीय लोकशाहीच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे. लोकशाहीत निवडून आलेलं सरकार निर्णय घेते. नियुक्त केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर करून लोकनियुक्त सरकारकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा आहे.”

“माझा पक्ष आणि महाराष्ट्राची जनता केजरीवालांना नक्कीच पाठिंबा देईल”

“आज दिल्लीत कोणतं सरकार आहे यावर भांडण्याची वेळ नाही. आज लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. सामान्य लोकांचं मत घेऊन आपलं सरकार स्थापन करण्याचा अधिकार वाचवण्यासाठी आज ARVIND KEJRIWAL  भगवंत मान या ठिकाणी आले आहेत. त्या मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा मागितला आहे. माझ्यासह माझा पक्ष आणि महाराष्ट्राची जनता याला नक्कीच पाठिंबा देईल,” असं शरद पवारांनी सांगितलं.

“देशभरातील इतर नेत्यांचाही पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करू”

शरद पवार पुढे म्हणाले, “NCP पक्ष स्वतः पूर्ण मदत करेनच, याशिवाय देशभरातील इतर नेत्यांचाही पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. मला संसदेत येऊन सलग ५६ वर्षे झाली आहेत. त्यामुळे याचा एक फायदा होतो तो म्हणजे देशातील कोणत्याही राज्यात गेलं तरी तिथं कोणताही नेता किंवा खासदार यांच्याशी व्यक्तिगत संबंध आहेत. अनेकांबरोबर मी काम केलं आहे.”

“हा प्रश्न दिल्लीचा किंवा आप पक्षाचा नाही”

“हा प्रश्न दिल्लीचा किंवा आप पक्षाचा नाही. हा प्रश्न या देशात लोकनियुक्त सरकारला दिलेला निर्णय घेण्याचा अधिकार वाचवण्याचा आहे. राष्ट्रवादी स्वतः पाठिंबा तर देईलच, पण इतर राज्यात जाऊन इतर नेत्यांना-पक्षांना या मुद्द्याला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करू,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *