• Thu. Apr 25th, 2024

महामानवांच्या संयुक्त जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Byjantaadmin

May 31, 2023

मुंबई,  : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी महाराष्ट्र घडविला. त्यांनी महाराष्ट्रासह देशाला दिशा दिली. अशा महामानवांच्या जयंतीचा संयुक्त उपक्रम कौतुकास्पद आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा आज दुपारी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत ढोके, सविता शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा,  आमदार भरत गोगावले, आमदार संतोष बांगर, माजी आमदार शिरीष चौधरी आदींनी या सोहळ्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचा हा उपक्रम आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे दरवर्षी प्रबोधनपर उपक्रम राबविले जातात. या संघटनेचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. यावेळी व्याख्याते रवींद्र शिवाजी केसकर यांनी ‘माणसाची एकच जात, दोन पाय- दोन हात’ याविषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर संगीतकार जॉली मोरे, शाहीर सीमा पाटील यांनी ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा’ या विषयावर प्रबोधनपर गीते सादर केली.

संघटनेतर्फे देण्यात येणारा सन २०२३ चा डॉ. बी. आर. आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार ५१ रुपये रोख, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *