• Wed. Apr 24th, 2024

‘भारतातील मुस्लिमांची सध्याची अवस्था ऐंशीच्या दशकातील दलितांसारखी’

Byjantaadmin

May 31, 2023

 राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात बोलताना भारतीय मुस्लिमांच्या परिस्थितीबद्दल केलेल्या विधानामुळं वादळ उठलं आहे.

Rahul Gandhi on Indian Muslims : अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेथील विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केलेल्या विधानांवरून देशात राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी भारतातील मुस्लिमांच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल विधान केलं आहे. देशातील मुस्लिमांची सध्याची परिस्थिती ८० च्या दशकातील दलितांसारखी आहे, असं राहुल यांनी म्हटलं आहे.

https://c.ndtvimg.com/2023-05/tosjhn4g_rahul-gandhi_625x300_31_May_23.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=650,height=400

सॅनफ्रान्सिस्को इथं ‘मोहब्बत की दुकान’ या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांना एका विद्यार्थ्यानं भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल प्रश्न केला. त्याला राहुल यांनी उत्तर दिलं. त्यांच्या विधानाचा रोख भाजप सरकारच्या कारभारावर होता. भारतात आज मुस्लिमांसोबत जे काही घडतंय, ते ऐंशीच्या दशकात देशातील दलित समाजासोबत व्हायचं. प्रश्न केवळ मुस्लिमांचा नाही, भारतातील शीख, ख्रिश्चन, दलित, आदिवासी यांची भावना देखील मुस्लिमांसारखीच असेल याची मला खात्री आहे. या आव्हानाला सामोरं जावं लागेल, असं ते म्हणाले.

भारत जोडो यात्रा रोखण्याचा प्रयत्न

काँग्रेसची भारत जोडो यात्रा रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केंद्र सरकारनं केला होता, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदी सरकारनं यात्रा रोखण्यासाठी सर्व ताकद लावली होती. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही, उलट लोकांमध्ये यात्रेविषयी कुतूहल निर्माण झाला. लोकप्रियता वाढत गेली, कारण ‘भारत जोडो’ ही संकल्पना प्रत्येक देशवासीयाच्या मनात आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

भाजपचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेस नेते राहुल यांच्या या वक्तव्यामुळं भारतातील राजकारण तापलं आहे. राहुल गांधी हे विदेशात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व देशाचा अपमान करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. अशा नेत्यावर भारतीयांनी बहिष्कार टाकला पाहिजे, असं भाजपनं म्हटलं आहे.

संजय राऊत यांचा पाठिंबा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. ‘राहुल गांधी हे काहीही चुकीचं बोललेले नाहीत. त्यांनी केवळ देशातील प्रश्न मांडले आहेत. देशात राजकारण करणं कठीण झालं आहे ही वस्तुस्थिती आहे, असं राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *