• Fri. Apr 19th, 2024

रुपाली चाकणकरांना व्हायचंय आमदार, तेही….

Byjantaadmin

May 31, 2023

खडकवासला मतदारसंघाची २०१९ ची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. शेवटपर्यंत चुरशीची राहिलेल्या निवडणुकीत भाजपच्या भीमराव तापकीरांनी राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंचा निसटता पराभव केला होता. यंदा खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी कुणाला संधी देणार याविषयीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

Rupali Chakankar

याचदरम्यान,आता खडकवासला मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी मोठं विधान केलं आहे. २०२४ ला खडकवासला मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागणार असल्याचं चाकणकर यांनी म्हटलं आहे. रुपाली चाकणकर यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खडकवासला मतदारसंघातील उमेदवारीवर भाष्यं केलं. चाकणकर म्हणाल्या, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळीच मी उमेदवारीसाठी अर्ज अजित पवारांकडे दिला होता. खरंतर निसर्ग मंगल कार्यालयात सर्वच इच्छुक उमेदवारांचीही मुलाखत होती. त्यात माझीही मुलाखत होती. मात्र,ज्या दिवशी माझी मुलाखत होती.त्याचदिवशी अगोदरच्या महिला प्रदेशाध्यक्षा पक्ष सोडून गेल्या. आणि माझ्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे पुढे त्याचंच काम करत राहिले. पण आता २०२४ ला खडकवासला मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागणार असल्याचं प्रतिक्रिया चाकणकरांनी दिली आहे.

भाजप की राष्ट्रवादी..?

विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत भाजप की राष्ट्रवादीकडून लढणार या विचारलेल्या प्रश्नावर चाकणकर म्हणाल्या, मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादीकडूनच लढणार आहे. मी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवारसाहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजितदादा पवार यांच्याकडे तिकीट मागणार आहे. मी तिकीट मागणार आहे, माझ्यासोबत इतर कोण तिकीट मागेल हे मला माहिती नाही. स्पर्धक असणार आहे.

…यापूर्वीच आमदार होण्याची व्यक्त केली होती इच्छा…

रुपाली चाकणकर यांनी ‘सरकारनामा’ला दिलेल्या मुलाखतीत खडकवासला मतदारसंघाच्या उमेदवारीसह विविध मुद्द्यांवर सूचक विधान केलं होतं. मागच्या निवडणुकीवेळीच मी उमेदवारीसाठी अर्ज अजित पवारांकडे दिला होता. मात्र,माझी ज्यादिवशी मुलाखत होती. त्याच दरम्यान अगोदरच्या महिला प्रदेशाध्यक्षा पक्ष सोडून गेल्या. खरंतर निसर्ग मंगल कार्यालयात सर्वच इच्छुक उमेदवारांचीही मुलाखत होती.त्यात माझीही मुलाखत होती.पण आता खडकवासल्यातून आमदार होण्याची इच्छा रुपाली चाकणकरांनी व्यक्त केली होती. स्पर्धक असेल तर तुम्हांला काम करायला मजा येते. तुमच्या कामाचं मूल्यांकन करता येतं. जिथे स्पर्धाच नसेल तर तुम्ही विजेता कसे ठरता. स्पर्धकच नसेल तर तुम्ही जिंकू शकत नाही. त्यामुळे स्पर्धक हवेच असंही चाकणकर म्हणाल्या होत्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *