• Mon. Oct 2nd, 2023

अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरात   प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार –  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

Byjantaadmin

May 31, 2023

अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरात   प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार –  जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

लातूर, दि. 31 (जिमाका): महिलांच्या समस्यांचे स्थानिकस्तरावर निराकरण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

राज्यातील महिलांसाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना देण्यासाठी, तसेच शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी  महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.

जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीमधील विजेत्या 8 महिलांना यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपमुख्य कार्यकारी देवदत्त गिरी, तहसीलदार भारत सूर्यवंशी, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, बालविकास प्रकल्प अधिकारी विद्यासागर यादव, शुभांगी क्षीरसागर, जया माळी यावेळी उपस्थित होत्या.

कोविडमुळे पतीचा मृत्यु झालेल्या किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना सर्व योजनांचा लाभ प्राधन्याने देण्याचे नियोजन सर्व विभागांनी करावे. ज्या शासकीय कार्यालयात हिरकणी कक्षाची अद्यापही स्थापना झालेली नाही, अशा कार्यालयात तत्काळ या कक्षाची स्थापना करावी. आरोग्य विभागामार्फत संजीवनी अभियान भाग-2 राबविण्यात येणार असून यामध्ये स्तनाचा कर्करोग व मणक्याच्या कर्करोगाचे प्राधन्याने निदान करून उपाययोजना करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

विधवा महिलांसाठी अहिल्यादेवी विहीर योजना पंचायत समितीमार्फत राबविण्यात येते आहे. ग्रामीण भागात आठ ‘अ’चा उतारा व मालमत्तामध्ये पुरुषांसोबत महिलांचेही संयुक्तपणे नाव लावले जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवडीचे महत्व विशद करून महिलांनी वट सावित्री पौर्णिमेनिमित्त किमान एक वट वृक्ष लावावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यामुळे तृणधान्याचा आहारामध्ये संतुलित वापर करून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन श्री. गोयल यांनी यावेळी केले.

प्रारंभी उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांनी प्रास्ताविक करून उपक्रमांची संकल्पना विशद केली. अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी पोलीस विभाग महिलांसाठी  राबवीत असलेल्या उपक्रमांची माहीती देवून महिलांसंदर्भातील कोणत्याही स्वरूपाची तक्रार पोलीस यंत्राणा प्राधन्याने सोडवतात असल्याचे सांगितले.  श्रीमती जया माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *