• Mon. Oct 2nd, 2023

तर कुठल्या खेळाडूला स्वत:च्या रक्ताचं पाणी करून देशासाठी खेळावं वाटेल? राज ठाकरेंचं मोदींना खरमरीत पत्र

Byjantaadmin

May 31, 2023

मुंबई : ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटी’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. आपण ‘प्रधानसेवक’ या नात्याने लक्ष द्या, असं सांगतानाच महिला खेळाडूंच्या पाठिशी आपण जर उभे राहिलो नाही तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्रच राहील, अशी भीती मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलीये. दिल्लीतून महिला खेळाडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना खरमरीत पत्र लिहिलंय.

Mns Chief Raj Thackeray Wrote Letter To PM Narendra Modi Over Wrestlers Protest

राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलंय…?

सन्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी
सस्नेह जय महाराष्ट्र,

आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर… पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावे ही विनंती.ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटी असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी तशी त्या महिला कुस्तीपटूची इच्छा आहे जशी ती विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दु:खाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्रच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केले जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे. आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *