• Thu. May 9th, 2024

‘त्यावेळी भलतंच धाडस करावं लागलं”, एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य

Byjantaadmin

Jun 30, 2023

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  BJP पक्ष यांच्या नेतृत्वातील सरकारला वर्षपूर्ती होतंय. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ठाण्यात जल्लोषाचं वातावरण आहे. ठाण्यात सरकारच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वर्षभरापूर्वी घडलेल्या घडामोडी पुन्हा एकदा सांगितल्या. विशेष म्हणजे आपण जो निर्णय घेतला तो खूप कठीण निर्णय होता. त्यावेळी आपल्याला भलतंच धाडस करावं लागलं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी पुन्हा त्या दिवसांची आठवण काढत घडामोडी सांगितल्या. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

“ठाणेकरांनी हा वर्षपूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मला वर्षभरापूर्वीचे ते दिवस आठवत आहेत. या राज्यात मुंबईत सगळीकडे देशभरात आणि जगभरात काय तो माहौल झाला होता. आपल्याला एक वेगळं वातावरण बघायला मिळालं. परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर्वसामान्यांचा मनामध्ये एकच विचार होता की, सर्वसामान्य माणसाला न्याय, हक्क मिळवून देणारं सरकार या राज्यात स्थापन झालं पाहिजे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘ज्यांच्या मनात पाप होतं त्यांनी…’

“2019 ला अधिकृतपणे शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली. आपण अधिकृतपणे युती म्हणून निवडणुका लढवल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आपण पुढे घेऊन गेलो. एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांचे फोटो लावून आपण मतं मागितली. हे सरकार पुन्हा येणार, त्याप्रकारे दोन्ही पक्षांना बहुमत मिळालं. पण दुर्देवाने निवडणुकीचे निकाल जसे घोषित झाले त्यावेळी वेगळे स्टेटमेंट सुरु झाले”, असं शिंदे म्हणाले.

ज्यांच्या मनात पाप होतं त्यांनी सांगितलं की, आम्हाला सगळे दरवाजे उघडे आहेत. निवडणुका शिवसेना-भाजप म्हणून युती लढवल्या. युतीचं सरकार व्हावं असं लोकांच्या मनात होतं. पण सरकारच्या मनाविरुद्ध सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस सरकार काळातले सर्व प्रकल्प बंद केले. हे सगळं केल्यानंतर सर्वसामान्यांचा श्वास गुदमरु लागला. आमदार अस्वस्थ झाले. शिवसेना, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘त्यावेळी भलतंच धाडस करावं लागलं’

“शिवसेना वाचवण्यासाठी आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी त्यावेळी भलतंच धाडस करावं लागलं. ते धाडस सोपं नव्हतं. शेवटी या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, शिवसैनिक, आमदारांच्या मनात जे घडत होतं, जो उद्रेक होता त्याला वाचा फोडण्याचं काम एकनाथ शिंदेने केला. सरकार स्थापन झालं. सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. सरकारने मोठमोठे निर्णय घेतले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

’50 लोकांचं काय होणार?’

“मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघंच सुरुवातीला मंत्रिमंडळात होतो. पण आम्ही लोकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. कॅबिनेटचे सर्व निर्णय लोकहिताचे होते. आपण सर्वांनी त्या काळात साथ दिली. प्रसंग बाका होता. काही लोकं आपल्या पाठिशी मनापासून होते. तर काही विचार करत होते की, एकनाथ शिंदेचं काय होणार, ५० लोकांचं काय होणार? मी माझ्या आयुष्यात अनेक निर्णय धाडसाने घेतले. माझ्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते आनंद दिघे यांचा आशीर्वाद होता”, असंही ते यावेली म्हणाले.

‘वाटलं नव्हतं, मुख्यमंत्री म्हणून…’

“मला वाटलं नव्हतं की, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला जबाबदारी पार पाडावी लागेल. पण बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेल्यानंतर, एवढं मोठं धाडस केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मला मुख्यमंत्रीपदाची जबाबादारी दिली. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सहकार्य केलं. खास करुन मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करेन. कारण या एकनाथ शिंदेने जे धाडस केलं त्या धाडसाच्या पाठिमागे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम उभी राहिली, म्हणून हा प्रयोग यशस्वी झाला”, असं मत एकनाथ शिंदे यांनी मांडलं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *