• Thu. May 9th, 2024

करोना निर्बंध नसताना मोदींच्या पुणे दौऱ्यानिमित्त अडीचशे जणांच्या चाचण्या कशासाठी?

Byjantaadmin

Jul 31, 2023

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. यातच अतिउत्साह दाखवत पुणे महापालिकेने करोनाची साथ नसतानाही दौऱ्यातील कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या सुमारे अडीचशेहून अधिक जणांच्या चाचण्या केल्या आहेत. मोदींसोबत मंचावर हजर राहणाऱ्या आणि नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची करोना तपासणी तातडीने करण्यात आली.पंतप्रधानNARENDRA MODI  १ ऑगस्टला PUNE दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यानिमित्त नियोजन करण्यासाठी पुणे महापालिकेने नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत मोदींच्या दौऱ्यादरम्यान मंचावर उपस्थित असणारे नेते, अधिकारी यांची करोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दौऱ्यात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे, पंतप्रधान कार्यालयाने कोणतीही सूचना केलेली नसताना महापालिकेने हे पाऊल उचलले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

covid test of 250 people for before narendra modi pune

 

महापालिकेच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर तातडीने चक्र फिरले. सुमारे ७२ तास आधी चाचणी करणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवार असूनही सकाळी लवकर कामावर बोलाविण्यात आले. मोदींच्या पुण्यातील दौऱ्यात सहभागी होणारे आमदार, राजकारणी, समाजकारणी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांची यादी तयार करण्यात आली. महापालिकेने सुमारे अडीचशे जणांची यादी तयार केली. त्यानुसार आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून या अडीचशे जणांशी संपर्क साधून त्यांचे नमुने गोळा केले. या नमुन्यांची आरटीपीसीआर चाचणी ससूनमध्ये करण्यात आली.

देशभरात करोनाची लाट ओसरली असून, सर्व निर्बंध हटविले असतानाही महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंतप्रधान कार्यालयाने सूचना केलेली नसताना महापालिकेने कोणत्या आधारावर हा निर्णय घेतला, असा प्रश्न आरोग्यतज्ज्ञांकडून विचारला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी महापालिकेत बैठक झाली. मोदींच्या दौऱ्यात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या व्यक्तींची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही चाचणी करण्यात आली. – डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, महापालिका

करोनाची कोणताही साथ नसताना आणि रुग्णसंख्या नसताना करोना चाचण्या करण्यात आल्या. त्याची अजिबात आवश्यकता नव्हती. आपण काही तरी करतोय हे दाखविण्यासाठी महापालिकेकडून हा हास्यास्पद प्रकार सुरू आहे. – डॉ. अविनाश भोंडवे, आरोग्यतज्ज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *