• Thu. May 9th, 2024

2024 मध्ये कोणत्या राज्यात काय होईल, पाहा सर्व्हेचे आकडे काय सांगतात

Byjantaadmin

Jul 31, 2023

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी सर्वांनी तयारी सुरु केली आहे. भाजपविरोधी पक्ष एकत्र आले असून त्यांनी आघाडीला इंडिया नाव दिलेय. भाजपनेही मित्रपक्षांसोबत बैठक घेतली. एनडीए vs इंडिया असेच चित्र लोकसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच एक सर्वे समोर आलाय. इंडिया टिव्ही-CNX यांनी देशातील जनतेचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.  देशभरातील 543 लोकसभा जागांवर हा सर्व्हे करण्यात आलाय, त्यानुसार, काही राज्यात धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. पाहूयात सर्व्हेमध्ये नेमकं काय आहे ?

या राज्यामध्ये भाजपचाच बोलबाला – 

सर्व्हेनुसार गुजरात, बिहार, उत्तराखंड, गोवा, दिल्ली, उत्तर प्रदेश, ईशान्येकडील राज्य, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यामध्ये एनडीएचा दबदबा असेल. येथे एनडीएला मोठा विजय मिळू शकतो. यामध्ये काही राज्य अशी आहेत, जिथे भाजप अथवा एनडीएचे सरकार नाही. त्याशिवाय कर्नाटकमध्येही भाजपला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसलाय.

सर्व्हेच्या आकडेवारीनुसार, गुजरात, उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व लोकसभा जागांवर एनडीएचे उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 26, उत्तराखंड 5 आणि गोव्यात दोन जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. मणिपूरवगळता ईशान्यकडील 9 जागांवर भाजपचा विजय होऊ शकतो. उत्तरप्रदेशमध्ये 80 पैकी 73, बिहारमध्ये 40 पैकी 24, MAHARASHTRA त 48 पैकी 24, कर्नाटकमध्ये 28 पैकी 20, राजस्थानमध्ये 25 पैकी 21 आणि मध्यप्रदेशमध्ये 29 पैकी 24 जागांवर एनडीएला विजय मिळण्याची शक्यता आहे.

या राज्यात एनडीएला फटका – 

सर्व्हेनुसार, काही राज्यांमध्ये एनडीएला एकही जागा मिळणार नाही अथवा खूप कमी जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यात खूप कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये 39 पैकी 9 आणि पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 12 जागांवर एनडीएला विजय मिळण्याची शक्यता आहे. केरळ, पंजाब आणि मणिपूरमध्ये भाजपला शून्य जागा मिळण्याची शक्यता आहे.

या राज्यात INDIA ला फटका –

गुजरात, बिहार, उत्तराखंड, गोवा, दिल्ली, ईशान्यकडील राज्य, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये विरोधकांना अपयश येण्याची शक्यता आहे. गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर वगळता ईशान्यकडील राज्यातील 9 जागांवर केलेल्या सर्व्हेत इंडियाला शून्य जागा मिळण्याची शक्यता आहे.

या राज्यात INDIA चा दबदबा

सर्व्हेनुसार, चार राज्यात विरोधी पक्षाच्या इंडियाला मोठं यश मिळू शकते. यामध्ये तामिळनाडू 39 पैकी  30 आणि पश्चिम बंगालमध्ये 42 पैकी 30 जागा इंडियाला मिळू शकतात. केरळमधील सर्व 20 आणि पंजाबमधील सर्व 13 जागांवर इंडियाचा विजय होण्याचा अंदाज आहे.

ना एनडीए, ना इंडिया…. या राज्यात इतरांचा दबदबा 

सर्व्हेनुसार, काही राज्यात एनडीए आणि इंडिया या दोघांनाही यश मिळणार नाही. आंध्र प्रदेशमधील 25 जागांवर इतर पक्षाला यश मिळेल. ओडिशाच्या 21 जागापैकी एनडीएला 8, इंडियाला शून्य आणि इतरांना 13 जागा मिळू शकतात. त्याशिवाय तेलंगणामध्ये एनडीएला 6, इंडियाला 2 आणि इतरांना 9 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *