• Wed. May 8th, 2024

पैसे नसतील तर सांग, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो आणि तुला देतो, बच्चू कडू सचिनविरोधात आक्रमक

Byjantaadmin

Aug 31, 2023

मुंबई : प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. भारतरत्न पुरस्कार असलेल्या व्यक्तीने ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणं योग्य नसल्याचं सांगत पैसे नसतील तर सांगा, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो अन् त्यातील पैसे तुम्हाला देतो पण अशी जाहिरात करू नका, असं म्हणत बच्चू कडू यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सचिनच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सचिनच्या घराबाहेरील परिसर दणाणून गेला होता. दरम्यान, पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन जुगाराची एक जाहिरात केली होती. या जाहिरातीत सचिनने काम करण्यावर बच्चू कडू यांनी आक्षेप नोंदवला होता. ऑनलाईन गेमिंगच्या या जाहिरातीमुळे सचिन तेंडुलकरला मानणाऱ्या तरुणाईवर परिणाम होत असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरने एकतर ही जाहिरात सोडावी किंवा त्याला देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार तरी त्याने परत करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. त्यांच्या मागणीनंतरही सचिनने कोणतंही पाऊल उचललेलं नव्हतं. अखेर आज बच्चू कडू यांनी सचिनच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

Sachin Tendulkar And bacchu Kadu

 

आज सकाळी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू स्वत: आंदोलनात सहभागी झाले. तसेच याविषयी सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीसही पाठवली असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं. यावेळी बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. परत करा-परत करा… भारतरत्न परत करा, आमचा देव जुगार खेळतो, अशा घोषणा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.सचिन तेंडुलकरने ही जाहिरात सोडली नाही तर आम्ही प्रत्येक गणपती मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत. दानपेटीत जमा होणारा सर्व पैसा गणेश विसर्जनाच्या दिवशी सचिन तेंडुलकरला आणून देऊ. आम्ही गणपतीलाही प्रार्थना करू की सचिनला चांगली बुद्धी दे. भारतरत्न उद्या जुगाररत्न होऊ नये, आमची एवढीच इच्छा आहे, असं बच्चू कडू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *