• Wed. May 8th, 2024

महाराष्ट्रात पावसाने तब्बल 123 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, सर्वात कमी पाऊस

Byjantaadmin

Aug 31, 2023

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्रासह संपूर्ण देश दुष्काळाच्या वेशीवर आहेत. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल 59.42 टक्के कमी पाऊस पडला आहे. तर देशात 36 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडला आहे. राज्यातील पाऊस हा सरासरीच्या 11 टक्के कमी पडला आहे. ऑगस्ट महिन्यातला या वर्षाच्या पावसाने 123 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे सरासरी पावसाच्या खूप खाली आहेत, असं के. एस. होसाळीकर यांना सांगितलं आहे.

महाराष्ट्रच नव्हे तर देशातल्या अनेक राज्यांच्या वेशीवर दुष्काळाचं संकट येवून ठेपलंय. 123 वर्षानंतर यंदाचा ऑगस्ट महिना सर्वाधिक कोरडा गेल्याची नोंद झालीय. याआधी 1901 सालात ऑगस्ट महिना सर्वाधिक कमी पर्जन्यमानाचा होता, त्यानंतर यंदा तशी स्थिती निर्माण होण्याची स्थिती आहे. महाराष्ट्रास देशातल्या अनेक राज्यांत दुष्काळाचे ढग घोंगावत आहेत. महाराष्ट्राबरोबरच झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, मणिपूर, अरुणाचल, आसाम, लडाख, हिमाचल आणि कर्नाटकच्या काही भागात दुष्काळाची तीव्रता अधिक दिसू शकते.

 

Maharashtra Rain | महाराष्ट्रात पावसाने तब्बल 123 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला, सर्वात कमी पाऊस

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती

यंदा देशाचा मोठा भूभाग दुष्काळ होरपळण्याचे भाकीत वर्तवले जात आहेत. जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, तर ऑगस्ट महिन्यात सरासरीहून 71 टक्के कमी पाऊस झालाय. 329 महसूल मंडलात गेल्या महिन्याभरात पावसाचा ठिपूसही पडलेला नाही, यावरुन जर आगामी काळात चित्र नाही बदललं, तर भविष्यात दुष्काळाची छाया दिसू लागलीय.महाराष्ट्र बघितला तर कोकण वगळता नाशिक, धुळे, नगर, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद या जिल्ह्यात दुष्काळस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

धरणाच्या पाणी पातळीत घट

पावसानं सुट्टी घेतल्यामुळे धरणांचीही पातळी कमी होत चाललीय. उदाहरण म्हणून जर उजणी धरण पाहिलं. तर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात उजनी धरण 101 टक्के भरलं होतं. यावेळी उजनीत फक्त 7.42 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उरलाय. पुढच्या 20 ते 25 दिवसात पाऊस नाही झाला तर उजनीत फक्त 2 ते 3 टीएमसी पाणी उरण्याची चिन्हं आहेत.

पावसाअभावी सोयाबीन, कापसाची अवस्था बिकट झालीय. विदर्भ आणि मराठवाड्यातली कोरडवाहू शेती धोकादायक स्थितीत आहे. उत्तर महाराष्ट्रातली पिकं पाण्याअभावी सुकण्याच्या वाटेवर आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रातल्या फळबागांचीही पावसाअभावी वाढ खुंटलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *