• Mon. Apr 29th, 2024

कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, मंत्री अब्दुल सत्तारांचे आदेश

Byjantaadmin

Sep 20, 2023

कांदा   उत्पादक शेतकऱ्यानंतर (Farmers) आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. प्रलंबित मागण्यासंदर्भात तोडगा निघू शकला नसल्यानं आजपासून कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. दरम्यान, लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणन मंत्री अब्दुल सत्तार  यांनी दिले आहेत. सणासुदीच्या काळात लिलाव बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळं पणन आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना सत्तारांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे आजपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच कांद्याचे निर्यातमूल्य वाढवल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला. यावेळी सत्तारांनी लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

 ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना धरलं वेठीस

ऐन सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य नसल्याचे सत्तार म्हणाले. येत्या 26 तारखेला व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते, मात्र लिलाव बंद ठेवल्यानं व्यापाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. या कारवाईसाठी पणन आयुक्त, सहकार आयुक्त तसेच नाशिक जिल्हाधिकारी यांना तशा सूचना केल्याचे देखील मंत्री सत्तार यांनी सांगितले. मंत्री सत्तार हे नाशिकच्या येवल्यात एका खासगी कामासाठी आलेले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कांद्यावर निर्यात मूल्य आकारल्यानंतर त्याचा तोटा व्यापाऱ्यांना होत असल्याच्या कारणावरुन व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमधील लिलाव आजपासून बेमुदत बंद ठेवले आहेत. या संपामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *