• Thu. May 9th, 2024

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मैदानात, वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार?

Byjantaadmin

Dec 27, 2023

एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे. प्रत्येक loksabha  निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष असते. सोलापूरला काँग्रेसचा (Congress) गड म्हणून ओळखलं जायचं, पण मागील दोन निवडणुकीत येथे भाजपनं बाजी मारली. सोलापूर लोकसभा मतदार संघ अनुसुचित जाती (SC) साठी राखीव आहे. (jaisidhesvar swami) हे सोलापूरचे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी (2019 Loksabha Election Result) (sushilkumar shinde) यांचा पराभव केला होता.  आता सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली, पण आपल्या मुलीसाठी त्यांनी फिल्डिंग लावली. सोलापूर मतदारसंघातून यावेळी (Praniti Shinde) खासदारकीसाठी उतरतील, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलेय. सोलापूर मतदारसंघात लिंगायत, मराठा आणि मागसवर्गीय या तीन मताला (OBC Vote) मोठी किंमत आहे. पण या सोलापूर मतदारसंघाचा इतिहास  काय ? किती आमदार या मतदारसंघात येतात, कोणत्या पक्षाची किती ताकद ? आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर मतदार संघाचा आढावा घेऊयात..

सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाचे किती आमदार ?

सहा विधानसभा क्षेत्रांचा मिळून सोलापूर लोकसभा मतदारसंघ तयार झालाय. म्हणजे येथे सहा आमदार आहेत. मोहोळ  सोलापूर शहर उत्तर  सोलापूर शहर मध्य , सोलापूर दक्षिण, अक्कलकोट आणि पंढरपूर  हे विधानसभा मतदार संघ सोलापूर लोकसभामध्ये येतात. या सहापैकी चार आमदार भाजपचे आहेत, एक आमदार काँग्रेसचा आहे. सोलापूर शहर मध्य प्रणिती शिंदे या आमदार आहेत. तर मोहोळ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत माने  आमदार आहेत. सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख  आहेत. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी  आमदार आहेत. पंढरपूरचे समाधान आवताडे तर सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख आमदार आहेत. सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपचे सध्या चार आमदार आहेत, तर काँग्रेसचा एक आमदार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) एक आमदार आहे.

सोलापूर मतदार संघाचा इतिहास काय ?

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघाची ओळख होती. 1952 साली सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली. सुरुवातीचे पाच वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे शंकर मोरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशनचे पी. एन. राजभोग यांनी सोलापूरचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. 1957 साली सोलापुरात संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंत मोरे हे सोलापूरचे खासदार झाले.

मतदारसंघ स्थापनेच्या 10 वर्षानी सोलापुरात 1962 साली काँग्रेसचा उदय झाला. 1996 आणि 2003 या दोन निवडणुकांचा अपवाद वगळला तर 2014 पर्यंत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सोलापूर लोकसभा मतदार संघात गाजवलं. 1962 साली मडेप्पा उर्फ अप्पासाहेब काडादी, 1967, 1971, 1977 सुरजरत्न दमाणी, 1980, 1984 गंगाधर कुचन, 1989, 1991 धर्मन्ना सादुल या काँग्रेस नेत्यांनी सोलापुरात खासदारकीच्या माध्यमातून देशाच्या संसदेत नेतृत्व केलं.

भाजपला मिळाला पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार –

1996 मात्र काँग्रेसच्या विजयाचा रथ भाजपच्या लिंगराज वल्याळ यांनी पहिल्यांदा रोखला. लिंगराज वल्याळ यांच्या रूपाने केवळ सोलापूरचाच नाही तरं पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासदार भारतीय जनता पार्टीला मिळाला. मात्र केंद्रात इंदर कुमार गुजराल यांची सत्ता कोसळली त्यामुळे 1998 साली पुन्हा एकदा देशात निवडणुका लागल्या. याचं निवडणुकामध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या माध्यमातून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री झाली. 1998 आणि 1999 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवत विजय मिळवला. 2003 साली सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या सोलापूरच्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजच्याच सुभाष देशमुखानी विजयश्री प्राप्त केला.

2014 मध्ये काँग्रेसचा गड भाजपने जिंकला, सुशीलकुमार शिंदेंचा पराभव –

भाजपच्या विजयाचा गाडा 2009 साली सुशीलकुमार शिंदेनी पुन्हा एकदा रोखला. भाजपचे नवखे असलेले उमेदवार शरद बनसोडे यांचा पराभव करत सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात एन्ट्री केली. याच काळात शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, लोकसभेचे सभागृह नेते सारखे मोठी पदे भोगता आली. मात्र असं असताना देखील 2014 च्या मोदी लाटेत त्यांचा निभाव लागला नाही. नवख्या शरद बनसोडे यांच्याकडून शिंदेना परभावाचा स्वीकारवा लागला. सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो.मात्र 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला. नवखे असलेल्या शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला. त्यानंतर 2019 साली झालेल्या सलग दुसऱ्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदेना परभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामिनी शिंदे सारख्या दिग्गज नेत्याला धूळ चारली.

2019 त्रिशंकू लढत –

2019 ची निवडणूक ही अनेक अर्थानी महत्वपूर्ण होती. सुशीलकुमार शिंदे सारख्या दिग्गज नेत्यासमोर भाजपने विद्यमान खासदारचा पत्ता कट करून अध्यात्मिक गुरु असलेल्या आणि ज्यांचा राजकारनाशी कसलाच संबंध नाही अशा डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवलेलं होतं. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील याच मतदारसंघात शड्डू ठोकला होता. प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारानी राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली. सुशीलकुमार शिंदेचा सुमारे दीड लाख मतांनी डॉ. जयसिद्धेश्वर यांनी पराभव केला. तर प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 70 हजार मते मिळाली.

आता प्रणिती शिंदे मैदानात उतरणार का ?

2019 च्या निवडणुकीच्या प्रचारातच सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव सुशीलकुमार शिंदे यांनी खासदारकीचे उमेदवार म्हणून सांगितलेय. आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील लोकसभेच्या दृष्टीने  तयारी सुरु केली आहे. तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुधीर खरटमल यांनीही उमेदवारीची मागणी केली. भाजपकडून यंदा कुणाला तिकिट मिळेल, याचीही चर्चा सुरु आहे. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जातीचे दाखले वादग्रस्त ठरल्याने पुन्हा तिकिट मिळणार की भाजप नव्या उमेदवाराला संधी देणार ? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.  राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे, माळशिरसचे आमदार राम सातपूते यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे.

सोलापुरातील मतदारांचे प्रश्न कोणते ?

उत्तर भारताला जोडणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे. सोलापूरला दक्षिणेचे मँचेस्टर असेही म्हटले जात होते. मात्र सोलापूरचा विकास हवा तसा झाला नाही, अशी टीका सोलापूरकर करतात. रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने तरुण जिल्ह्याबाहेर जातात. चादरीच्या उद्योगात मंदी आहे.  बिडी कामगारांचे प्रश्न तसेच आहेत. मुबलक प्रमाणाच पाऊस न पडल्यामुळे पाण्याचीही समस्या मोठी आहे. मोहोळ, सोलापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये नेहमीच पाणीबाणी असतं. यंदा तर पाऊस कमी पडलाय, त्यामुळे ही समस्या जास्तच होऊ शकते. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये लिंगायत मतदार महत्वाची भूमिका बजवतात. त्याशिवाय मराठा आणि मागसवर्गीय समाजदेखील निर्णायक भूमिकेत आहे. सोलापूर विमानसेवेचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे, प्रत्येक निवडणुकीत हाच मुद्दा असतो. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर झाल्याने यंदा तरी विमानसेवा सुरु होणार का? असा प्रश्न आहे. राज्यातील सर्वाधिक ऊसाचे कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत, पावसाचे प्रमाण घटल्याने ऊस उत्पातक शेतकरी आणि कारखानदार यांच्यापुढेही मोठं संकट आहे.

प्रणिती वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार की भाजप हॅट्रिक करणार?

सोलापुरात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये थेट टक्कर होण्याची शक्यता आहे. 2019 च्या निवडणुकीत वंचितकडून प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले होते. त्यामुळे ही लढत त्रिशंकू झाली होती. पण यावेळी प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतील, याकडे solapur च्या मतदारांचे लक्ष लागलेय. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर भाजप पुन्हा धक्कातंत्राचा वापर करतेय, की विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना रिंगणात उतरवणार.. हे येणारा काळच ठरवेल. प्रणिती शिंदे आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा काँग्रेसला हा मतदारसंघ मिळवून देणार का? की भाजप खासदारकीची हॅट्रिक करणार? याचीही राजकीय चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *