• Mon. Apr 29th, 2024

आई, बहीण आणि मुलींच्या नावाने शिव्या देऊ नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तरुणांना कळकळीचं आवाहन

Byjantaadmin

Jan 12, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना मोठा सल्ला दिला आहे. तुम्हाला काही सूत्रं लक्षात घ्यावी लागतील. लोकल उत्पादनाला प्रोत्साहित करा. नशेपासून दूर राहा. ड्रग्सपासून दूर राहा. आई, मुलगी, बहीण यांच्या नावाने शिव्या देऊ नका. अशा शिव्या देण्याच्या सवयींविरोधात आवाज उठवा. हे प्रकार बंद करा. मी लालकिल्ल्यावरून हाच आग्रह धरला होता. आज पुन्हा हा आग्रह धरत आहे, असं कळकळीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

आई, बहीण आणि मुलींच्या नावाने शिव्या देऊ नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तरुणांना कळकळीचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये होते. नाशिकमध्ये युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. आजही आपण क्रांतीकारकांची आठवण करतो. त्यांनी इंग्रजांना नेस्तानाबूत केलं होतं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला सामाजिकतेच्या सशक्तीकरणाचा आधार बनवला. स्वातंत्र्यापूर्वी महापुरुषांनी देशाला मोठं योगदान दिलं. ते देशासाठी जगले आणि देशासाठीच प्राण दिले. त्यांनीच देशाला नवी दिशा दाखवली. आज अमृत काळात तुमच्यावर तीच जबाबदारी आहे. आता अमृतकाळात तुम्हाला भारताला नव्या उंचीवर न्यायचं आहे. तुम्ही असं काम करा की पुढच्या शतकात त्यावेळची पिढी तुमचं स्मरण करेल. तुम्ही तुमचं नाव सुवर्ण अक्षराने लिहू शकता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

एक कोटी तरुणांची नोंदणी

तुम्ही 21 व्या शतकातील सर्वात भाग्यशाली पिढी आहात. तुम्ही देशाला नव्या उंचीवर नेण्याचं काम करू शकता. भारतातील तरुण हे लक्ष्य गाठू शकतात. माझा सर्वाधिक भरवसा तुमच्यावर आहे. मेरा युवा भारत संघटनेशी वेगाने देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण जोडल्या जात आहे. माय भारत नंतरचा पहिला कार्यक्रम आहे. या संघटनेत 1 कोटी 10 लाख तरुणांनी नाव नोंदणी केली आहे. तुमचं सामर्थ्य आणि तुमचा सेवाभाव देश आणि समाजाला नव्या उंचीवर नेईल, असं मोदी म्हणाले.

रोड शोला प्रचंड गर्दी

दरम्यान, राष्ट्रीय युवा महोत्सवाचे औचित्य साधत नाशिक दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करत आसमंत दुमदुमून टाकला. मोदी यांच्या या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर झाल्याचं चित्र आज सगळीकडे पाहायला मिळाले. यावेळी मोदींवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

मोदींचं दणक्यात स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी युवा महोत्सवात आल्यावर त्यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. ढोलताश्यांच्या गजरात मोदींचं स्वागत करण्यात आलं. यावेळी विविध राज्यांच्या संस्कृतिचं दर्शनही घडवण्यात आलं. नाशिक ढोलच्या तालावर पंजाब, छत्तीसगड, हरयाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, सिक्किम, तेलंगाना, उत्तर प्रदेशातील कलाकारांनी आपल्या राज्यांची संस्कृती, परंपरा आणि कलांचं प्रदर्शन घडवलं. तर महाराष्ट्रातील कलाकारांनी भगवे फेटे आणि कपडे परिधान केले होते. ढोलताशांवर रंगबिरंगी लाईटचा झोत टाकण्यात आला होता. हे दृश्य अत्यंत विहंगम होतं. सर्वच राज्यांचे कलाकार एकवटल्याने सर्वांना एका जागी बसून भारतदर्शन करता आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *