• Fri. May 3rd, 2024

मोदी आता काळजीवाहू पंतप्रधान, निवडणूक आयोग भाजपची शाखा, EC ची नोटीस मिळताच…

Byjantaadmin

Apr 22, 2024

मुंबई : आचारसंहितेमध्ये कुणी मंत्री नसते, कुणी पंतप्रधान नसते, नरेंद्र मोदी हे आता देशाचे काळजीवाहू पंतप्रधान आहेत. त्यांच्या भाषणात दहा वर्षात केलेली कामे सोडून त्यांचा प्रचार नको त्या मुद्द्यांवर भरकटलेला आहे. कुणाला कमी मुले-कुणाला जास्त? हा काय प्रचाराला मुद्दा होऊ शकतो काय? अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच घरघर मोदी चालते मग आमचे हर हर महादेव आणि जय भवानी का चालत नाही? असा सवाल विचारत निवडणूक आयोग ही भाजपची शाखा झालेली आहे, अशा शब्दात निवडणूक आयोगालाही लक्ष्य केले.

तिहार जेल प्रशास अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिन देत नसल्याचा मुद्दा, एकनाथ शिंदे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेली मुलाखत, नरेंद्र मोदी यांचे मुसलमानांवरील वागद्रस्त वक्तव्ये, शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून आलेली नोटीस तसेच लोकसभा निवडणुकीचा प्रचार आदी मुद्द्यांवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

तुमचे ‘घर घर मोदी’ चालतंय, आमचे ‘हर हर महादेव’ चालत नाही का?

शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोटीसीवर राऊत म्हणाले, निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे. भारत निर्वाचन आयोगाचे नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग करावे. यांचे घर घर मोदी चालतंय, हर हर महादेव चालत नाही, जय भवानी चालत नाही. यांचं कसलं बकवास हिंदुत्व… बकवास हिंदुत्ववादी सरकार, अशा शब्दात त्यांनी निवडणूक आयोगाला आणि भाजपला लक्ष्य केले.

एकनाथ शिंदे कुणाकुणाजवळ जाऊन रडले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपमधील प्रमुख चार नेत्यांना मविआ सरकार तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट केला. यावर बोलताना राऊत म्हणाले, जे एकनाथ शिंदे तुरूंगात जायला घाबरले म्हणून भाजपच्या संगतीला गेले, ते आज काहीही उलट सुलट आरोप करतायेत. तुरुंगात जायचे नाही म्हणून ते कुणाकुणापाशी रडले? हे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये गेल्यानंतर रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानात खोटे बोलण्याचे ट्रेनिंग दिले जाते. आज जेलवारी टळली असेल पण उद्या टळणार नाही, असे राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *