• Fri. May 3rd, 2024

मोदींच्या कौतुकात मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंचा विसर ? शिवसैनिकांमध्ये चर्चा !

Byjantaadmin

Apr 22, 2024

शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीचे कौतुक केले. नगरमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला. तशी चर्चा सभेनंतर शिवसेनेमध्ये जोरदार रंगली होती. मुख्यमंत्री शिंदे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करत आपल्या भाषणाची नेहमी सुरुवात करतात. परंतु नगरच्या सभेत त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा पडलेला विसर चर्चेचा विषय ठरला आहे.

नगर शहरातील मध्यवर्ती भाग असलेले चितळे रोड हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तेथून काही अंतरावर शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिलभैया राठोड यांचे कार्यालयदेखील आहे. तिथेच काही अंतरावर ही सभा झाली. शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट दिवंगत उपनेते अनिलभैया राठोड यांच्या बालेकिल्ल्यात सभा होत असल्याने अनेकांचे कान लागले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण बारकाईने शिवसेनेच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते ऐकत होते. ठाकरे गटाचे पदाधिकारी यांची अपेक्षा होती, दिवंगत उपनेते अनिलभैया राठोड यांचे स्मरण मुख्यमंत्री शिंदे करतील. परंतु तसे काही झाले नाही. मुख्यमंत्री शिंदे यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचादेखील विसर पडल्याचे या वेळी दिसले.मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यापासून राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींच्या नखाची सर इंडिया आघाडीला नाही. राहुल गांधींचे अजून लॉन्चिंग सुरू आहे. तिकडे नरेंद्र मोदींनी चंद्रयान लॉन्चिंग केले’. राहुल गांधी स्वप्नातही पंतप्रधान होणार नाहीत. देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार फक्त नरेंद्र मोदी यांनाच आहे. कारण त्यांनी त्यांचे जीवन देशाला समर्पित केले आहे.पंतप्रधान मोदीअखंड व समरप्रित भावनेने देश विकासाचे काम करीत आहेत. महाविकास आघाडीचे वरून कोणी आले तरी काहीही फरक पडणार नाही. नगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार विखे यांना मत म्हणजे पंतप्रधान मोदी यांना मत असणार आहे. देशाच्या विकासाला मत असेल. मतदारसंघातील सर्व पाणी योजना पूर्ण करण्याचा माझा शब्द आहे. त्यामुळे मतदारांनी विरोधकांना पाणी पाजावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

महाविकास आघाडी रावणरूपी

विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे. महाविकास आघाडी रावणरूपी आहे. तिचे दहन करण्याचा संकल्प उद्याच्या हनुमान जयंतीच्या दिवशी करा. पंतप्रधान मोदी यांच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास आहे. देशात फक्त मोदी गॅरंटी चालली आहे. ती गॅरंटी देशाला बलशाली करणारी आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *