• Fri. May 3rd, 2024

मराठा समाज माझ्याच बाजूनं, संजय जाधवांनी प्रचार थांबवावा; महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचा दावा

Byjantaadmin

Apr 22, 2024

साडेतीन लाख मतांनी माझा विजय – महादेव जानकर 

आज विरोधक जरी म्हणत असले आम्ही निवडून येऊ, मात्र त्यांना मी सांगू इच्छितो कि मी जवळजवळ साडेतीन लाख मतांनी मी निवडून येणार आहे. त्यामुळे संजय जाधव यांनी आपला प्रचार करणे सोडून द्यावं, असा विश्वासही महादेव जानकरांनी व्यक्त करत संजय जाधवांवर टीकास्त्र डागले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. या जागेवर विजयी कामगिरी करण्यासाठी जवळ जवळ सर्वच पक्षानी आपली पूर्ण ताकद पणाला लावल्याचे दिसतंय. त्यामुळे मिळेल त्या संधीचे सोनं करत दोन्ही गटातील उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. अशातच आज याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय जाधव यांनी महयुतीचे उमेदवार महादेव जानकरांवर घणाघाती टीका केली आहे.

काय म्हणाले होते संजय जाधव? 

परभणीतील अक्षदा मंगल कार्यालयात परभणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, डॉक्टर यांच्याशी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना संजय जाधव म्हणाले की, 2024 सालची लोकसभा निवडणुकी वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे. भाजपने बारामती आणि माढाची जागा वाचविण्यासाठी महादेव जानकर यांना परभणीमध्ये पाठवले आहे. जानकर यांना परभणीतून उमेदवारी देताना त्यांना एका विशिष्ट जातीचे लेबल लावून पाठवले आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप मराठा आणि ओबीसी असे ध्रुवीकरण करून लढत असल्याचा आरोप जाधव यांनी केला. आता या आरोंपान महादेव जानकरांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकारण तापल्याचे बघायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *