• Mon. May 6th, 2024

पंजाला पहिल्यांदा मतदान करत असलो तरी त्या हातामध्ये मशाल, वर्षाताईला खासदार म्हणून दिल्लीत पाठवणार : उद्धव ठाकरे

Byjantaadmin

Apr 26, 2024

मुंबई : मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माझे मत वर्षा ताईला मिळणार असून ती खासदार म्हणून दिल्लीत जाईल, असा शब्द उद्धव ठाकरे
यांनी दिला.

तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील आणि कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना एबी फॉर्म दिले. त्यानंतर वर्षा गायकवाड यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. उमेदवारी मिळाल्याबद्दल वर्षा गायकवाड यांचं अभिनंदन करताना माझे मत वर्षाताईंनाच देईन आणि त्या खासदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माझे मत वर्षाताईंना, त्या खासदार म्हणून दिल्लीत जाणार

उद्धव ठाकरे म्हणाले, “वर्षाताई गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. जरी त्या मुंबई दक्षिण मध्यमधून इच्छुक होत्या, परंतु त्यांना आता उत्तर मध्यमधून उमेदवारी मिळाली आहे. त्या कुठूनही लढू शकतात आणि जिंकू शकतात. माझे मत त्यांना देणार आहे, त्यामुळे त्या नक्की विजयी होऊन दिल्लीला जातील”

पंजाला पहिल्यांदा मतदान करत असलो तरी त्या हातामध्ये मशाल

पंजाला पहिल्यांदा मतदान करत असलो तरी त्या हातामध्ये मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम होईल, त्यावेळी तुतारी फुंकणार आहोत, असं उद्धव ठाकरे गमतीने म्हणाले. त्याचवेळी उत्तरमधून उमेदवार कोण असेल, असे विचारल्यावर त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल, असेही मिश्किलपणे उद्धव म्हणाले.

मला विश्वास आहे २००४ ची पुनरावृत्ती होऊन मी खासदार होईल

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मी शालेय शिक्षणमंत्री म्हणून काम केले आहे. ते मला चांगले ओळखतात. आझ त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यांची मला खंबीर साथ आहे. मला विश्वास आहे २००४ ची पुनरावृत्ती होऊन मी खासदार होईल, अशा भावना वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केल्या.अजित पवार यांच्यावरील सिंचन घोटाळ्याचा आरोप, तसेच शिखर बँक घोटाळ्याबाबत भाजपमधील लोक आरोप करत होते. तेच लोक त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना क्लीन चीट कशा मिळाल्या, असे लोक विचारत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. नाना पटोले म्हणतात तसे काही लोक खेळणे आहेत, जशी चावी दिली जाईल तसे ते खेळतात, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *