• Sat. May 4th, 2024

ऋषभ पंतच्या अपघातानं टीम इंडिया हादरली

Byjantaadmin

Dec 30, 2022

डेहराडून, 30 डिसेंबर : टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत याच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका गंभीर होता की यात पंतची कार जळून खाक झाली आहे. ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात असताना त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकली. उत्तराखंडमधल्या रुरकीजवळ पहाटे 5.15 वाजता हा अपघात झाला आहे.

अपघातानंतर स्थानिकांनी ऋषभ पंतला बाहेर काढलं, यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. सगळ्यात आधी त्याला रुरकीमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, यानंतर आता त्याला डेहराडूनला नेण्यात आलं आहे. रस्त्यावर धुकं असल्यामुळे पंतला समोरचं दिसत नव्हतं, त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातामध्ये पंतच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तसंच त्याचा पायही फ्रॅक्चर झाला आहे.

ऋषभ पंतचा हा अपघात टीम इंडियाला मोठा धक्का ठरणार आहे, कारण भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला 9 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला ही सीरिज 2-0 किंवा 3-1 च्या फरकाने जिंकावी लागणार आहे. ऋषभ पंत हा टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. भारतीय टेस्ट टीममध्ये फॉर्मचा विचार केला तर सध्या पंत रोहित-विराटपेक्षाही चांगला खेळत आहे.

पंतचा हा अपघात बघता ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी तो फिट होईल याची शक्यता कमी आहे, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहोचण्याच्या टीम इंडियाच्या स्वप्नांना सुरूंग लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचाही कर्णधार आहे, त्यामुळे तो आयपीएलसाठी पूर्णपणे फिट होणार का? याबाबत फ्रॅन्चायजीचंही टेन्शन वाढलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *