• Fri. May 3rd, 2024

शुभांगी पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश:मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

Byjantaadmin

Feb 4, 2023

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना कडवी झुंज देणाऱ्या शुभांगी पाटील यांनी आज अधिकृतरित्या ठाकरे गटात प्रवेश केला.

मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांनी हाती शिवबंधन बांधले. तसेच, आता खरी लढाई सुरू झाली आहे, असा सूचक इशाराही शुभांगी पाटील यांनी दिला आहे.

मातोश्रीबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना शुभांगी पाटील म्हणाल्या, मी 2 फेब्रुवारीलाच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज मी शिवबंधन हाती बांधले आहे.

धरणे आंदोलन करणार

शुभांगी पाटील म्हणाल्या, माझी खरी लढाई आता सुरू झाली आहे. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारीच्या मुद्द्यावर मी आता आक्रमकपणे आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधून घेणार आहे. या मुद्द्यांवर मी एक दिवस धरणे आंदोलन करणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहोचण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.

मविआ माझ्यासोबतच होती

शुभांगी पाटील म्हणाल्या, पक्ष माझ्यावर जी जबाबदारी सोपवेल, ती मी पार पाडणार आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत मी कुठे कमी पडले, याचा विचार करुन पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, वंचित बहूजन आघाडी माझ्यासोबतच होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर माझ्यासाठी नाशिकमध्ये दोन सभा घेतल्या. या निवडणुकीत नाशिक विभागाकडून मला अपूर्व असे प्रेम मिळाले

शिवसेना कधीही सोडणार नाही

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत पराभव झाल्यानंतर शुभांगी पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, झाशीची राणी जशी लढली, तसे मला लढायचे होते. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार, मी शिवसेनेला कधीही सोडणार नाही, मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार असल्याचे शुभांगी पाटील यांनी म्हटले होते.शुभांगी पाटील यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने शुभांगी पाटील यांच्यावर टीका करत मविआलाही लक्ष्य केले होते. झाशीची राणीसोबत केलेली तुलना आता मविआ नेत्यांना चालते का? यावर मविआ नेते का बोलत नाही?, असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. त्याला काँग्रेसच्या सचिन सावंत यांनीही प्रत्युत्तर दिले. भाजपनेच कंगना राणावतची तुलना झाशीच्या राणीसोबत केली होती, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

शुभांगी यांनी 40 हजार मते मिळवली

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे विजयी झाले असले तरी शुभांगी पाटील यांनाही जवळपास 40 हजार मते पडली आहेत. त्यावर एका सामान्य लेकीच्या मुलीने एवढी मते मिळणे म्हणजे सामान्य बाब नाही, ही कमी पुढील निवडणुकीत भरुन काढू, असे शुभांगी पाटील यांनी म्हटले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *