• Mon. May 6th, 2024

लातूर जिल्ह्यातील 2 हजार 175 शेतकऱ्यांना मिळाले 10 कोटी रुपयांचे अनुदान

Byjantaadmin

Mar 30, 2023

लातूर जिल्ह्यातील 2 हजार 175 शेतकऱ्यांना मिळाले 10 कोटी रुपयांचे अनुदान

  • कृषि यांत्रिकीकरण योजनेतून मिळाला लाभ
  • विविध अवजारे, यंत्रे खरेदीसाठी 50 टक्केपर्यंत अनुदान
  • महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक

लातूर, दि (जिमाका): वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत असलेली जमीन धारण क्षमता, बैलाची कमी झालेली संख्या, शेती कामासाठी मजुरांची घटलेली संख्या व वाढते मजुरीचे दर, पिकांमध्ये, फळबागांमध्ये असलेली विविधता यामुळे कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे. यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमधून 2022-23 मध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील दोन हजार 175 शेतकऱ्यांना विविध अवजारे व यंत्रांसाठी 10 कोटी 1 लाख 19 हजार 882 रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने वेळोवेळी अद्ययावत केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कृषि यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- पौष्टिक तृणधान्य,  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- गळीत धान्य, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- कडधान्ये, राष्ट्रीय कृषि विकास योजना- कृषि यांत्रिकीकरण, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण, कृषि यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत विविध साधनांचा पुरवठा करण्यात येत आहे.

कृषि यांत्रिकीकरण योजनेतून या बाबींसाठी मिळते अनुदान

कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषि यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे व अवजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित अवजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित अवजारे, प्रक्रिया युनिटस् इत्यादी बाबींसाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरसाठी एक लाख ते सव्वा लाख रुपये, तसेच इतर बाबींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प किंवा अत्यल्प भूधारक व महिला शेतकरी यांना 50 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा मंजूर कमाल मर्यादा यापैकी जे कमी असेल इतके अनुदान दिले जाते.

कृषि अवजारे बँक स्थापन करण्यासाठीही मिळते अनुदान

पीक रचनेनुसार पिकाच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत तसेच प्राथमिक प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफक दराने यांत्रिकीकरणाची सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री असलेली कृषि अवजारे बँक स्थापन करण्यासाठीही कृषि यांत्रिकीकरण योजनेतून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना अर्थसहाय्य देण्यात येते.  यामध्ये कृषि अवजारे खरेदीसाठी भांडवली खर्चाच्या 40 टक्के इतकी अनुदान मर्यादा असून 4 लाख रुपये ते 25 लाख रुपयांपर्यंत ही अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.

अशी आहे योजनेसाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया

कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी महा-डीबीटी पोर्टलद्वारे अर्ज ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबीकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बाबी ज्या योजनेतून देता येऊ शकतील त्या योजनांतर्गत पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येते. लाभार्थी म्हणून निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना दहा दिवसांत आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती महाडीबीटी पोर्टलवरील लॉगीनद्वारे अपलोड कराव्या लागतात.

अवजारे खरेदी करताना निकषांचे पालन आवश्यक

औजारे खरेदीकरिता पूर्वसंमती मिळाल्यानंतर अवजारे, यंत्राची खुल्या बाजारातून खरेदी करताना स्वतःच्या बँक खात्यातून रोखरहित (कॅशलेस) पद्धतीने व्यवहार करणे बंधनकारक आहे. तसेच खरेदी करावयाचे अवजारे बीआयएस अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार, तांत्रिक निकषांनुसार असल्याचे प्रमाणित केलेली असावीत. अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत देयक ऑनलाईन स्वरुपात महाडीबीटी पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक पडताळणीची कार्यवाही झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर (डीबीटी) जमा करण्यात येते.

कृषि यांत्रिकीकरण योजनेतून आतापर्यंत दोन हजार 175 शेतकऱ्यांना अनुदान वितरण

जिल्ह्यात कृषि यांत्रिकीकरण योजनेतून आतापर्यंत 4 हजार 993 शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 840 शेतकऱ्यांनी अवजारे, यंत्रे खरेदीची बिले ऑनलाईन सादर केली आहेत. 29 मार्चपर्यंत त्यापैकी दोन हजार 175 शेतकऱ्यांच्या बिलांची पडताळणी होवून त्यांना 10 कोटी 1 लाख 19 हजार 882 रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

अहमदपूर तालुक्यातील 291 शेतकऱ्यांना 1 कोटी 33 लाख 93 हजार 56 रुपये, औसा तालुक्यातील 233 शेतकऱ्यांना 1  कोटी 27 लाख 33 हजार 35 रुपये, चाकूर तालुक्यातील 157 शेतकऱ्यांना 62 लाख 79 हजार 318 रुपये, देवणी तालुक्यातील 140 शेतकऱ्यांना 59 लाख 7 हजार 587 रुपये, जळकोट तालुक्यातील 64 शेतकऱ्यांना 39 लाख 43 हजार 105 रुपये, लातूर तालुक्यातील 542 शेतकऱ्यांना 2 कोटी 27 लाख 27 हजार 952 रुपये, निलंगा तालुक्यातील 215 शेतकऱ्यांना 98 लाख 19 हजार 162 रुपये, रेणापूर तालुक्यातील 180 शेतकऱ्यांना 85 लाख 93 हजार 355 रुपये, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील 99 शेतकऱ्यांना 31 लाख 86 हजार 427 रुपये आणि उदगीर तालुक्यातील 254 शेतकऱ्यांना 1 कोटी 35 लाख 36 हजार 885 रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित बिलांची पडताळणीची व अनुदान वितरणाची प्रगतीपथावर आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *