• Sun. Apr 28th, 2024

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या पॅनलचा धुव्वा, कन्नड बाजार समितीवर संजना जाधवांचं वर्चस्व

Byjantaadmin

Apr 30, 2023

कन्नड बाजार समितीमध्ये बीआरएस पक्षाचे नेते, माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्यात लढत झाली. यात संजना जाधव यांचे शिवशाही शेतकरी पॅनल पती हर्षवर्धन जाधव यांच्यापेक्षा वरचढ ठरले. या निवडणुकीत १८ पैकी १६ जागांवर हर्षवर्धन जाधव यांचा दारुण पराभव झाला. या निकालावरून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र असेल याबाबत सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

राज्यभरात झालेली बाजार समितीच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील बाजार समिती निवडणूक देखील चर्चेचा विषय ठरली होती. केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हे स्वतःची मुलगी संजना जाधव यांना कन्नड येथून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यासाठी तयारी देखील सुरू असल्याची माहिती आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काम करणाऱ्या तेलंगणाच्या बी आर एस पक्षामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे भविष्यातील विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव विरुद्ध पत्नी संजना जाधव अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे त्यापूर्वी होणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आणि याचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

त्यासोबतच ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत, माजी आमदार नितीन पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जिल्ह्यामध्ये हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या निकालाची चर्चा होती. मात्र या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलचा संजना जाधव व माजी आमदार नितीन पाटील यांनी धुव्वा उडवला. १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवत कन्नडमध्ये संजना जाधव यांचे वर्चस्व असल्याचं त्यांनी दाखवून दिलं अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *