• Mon. May 6th, 2024

चार वर्षात चार पॉवरबाज स्टंट, महाराष्ट्राच्या राजकारणाचे बिग बॉस शरद पवार

Byjantaadmin

May 6, 2023

महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ शांत झाले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाने त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांची जागा घेण्यास पक्षातील कोणीही तयार नव्हते.प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि अगदी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनीही वडिलांच्या जागा घेतली नाही. शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणतात ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शरद पवार राजकारण करतात आणि ठरवतात. स्पष्ट न बोलता विरोधकांना, बंडखोरांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी शरद पवार यांचे राजकीय स्टंट चर्चेत असतात.शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा तगडा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी अनेकांना पाणी पाजले. शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहीले आहेत. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. तसेच राज्यसभेवर खासदार आहेत. त्यामुळे त्यांचा राजकारणातील चाणक्य म्हणून विरोधकही गुणगान गातात. राजकीय स्टंट करुन देश हादरवणारे शरद पवार यांनी यापूर्वी केलेले स्टंट बाबात जाणून घेऊया.

राजीनामा नाट्य –

शरद पवार आता पुन्हा चर्चेत आले ते राजीनामा नाट्यामुळे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.शरद पवार यांनी कोणतीही बैठक घेतली नाही, चर्चा नाही, पुर्वकल्पना न देता निर्णय घेतला. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र शरद पवार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची जोरदार चर्चा आहे.शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा अजित पवारांसाठी धक्का मानली जात आहे. कारण शरद पवार यांचा राजीनामा स्वीकारण्याच्या बाजूने उघडपणे आणि जाहीरपणे बोलणारे अजित पवार हे एकमेव व्यक्ती होते. यासाठी त्यांनी वय आणि तब्येतीचा हवाला दिला होता.अजित पवार भाजपच्या जवळचे मानले जातात. ते राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे शरद पवारांनी आपती ताकद दाखवल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत देखील अजित पवार गैरहजर होते.

पहाटेचा शपथविधी –

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना-भाजप वेगळी झाली होती. त्यामुळे भाजपूढे सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी विचारले होते. मात्र राष्ट्रवादी आणि भाजप राजकारणीतल ३६ चा आकडा आहे. त्यामुळे शरद पवार यांना सत्तास्थापनेला विरोध होता.मात्र अजित पवार यांनी काही आमदारांच्या मदतीने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा भूकंप होता.शरद पवार यांनी अजित पवार यांची बंडखोरी मोडीत काढली. महाराष्ट्राच्या राजकारणातील बुद्धीबळाच्या पटावरील चाणक्य डाव शरद पवार यांनी खेळला. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादील बंडखोर चेकमेट झाले.शरद पवार यांनी काँग्रेस, आणि शिवसेनेच्या मदतीने महाविकास आघाडीची स्थापना केली. ते महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा झाले. त्यांनी तिन्ही पक्षाचे मोठे शक्ती प्रदर्शन देखील केले होते. यामुळे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर बहुमत नसल्यामुळे अजित पवार – फडणवीस यांचे दिड दिवसाचे सरकार पडले. शरद पवार यांचा डाव यश्वस्वी झाला.शरद पवार ऐवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. याच मुख्यमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेनेत लढाई सरु होती. तसेच अजित पवार यांचा बंड शांत करत त्यांना उपमुख्यमंत्री केले. पवार यांच्या या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्तरावर देखील नाचक्की झाली होती. भाजपला राजकारणातील पॉवर धडा पवारांनी भाजपला शिकवला होता

पावसातील सभा –

शरद पवार यांची पावसातील सभेने महाराष्ट्राचे राजकारण बदलले होते. २०१९ मध्ये शरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेने राज्यातील राजकीय चित्र बदलल्याचे निकालातून स्पष्ट झाले होते. ५० पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या.NCP  सोडलेल्या मोठमोठ्या नेत्यांनाही या शरद पवारांच्या सभेचा मोठा फटका बसला होता. शरद पवारांचे लहानपणीचे मित्र असलेल्या श्रीनिवास पाटलांसाठी भरपावसात घेतलेली साताऱ्याची सभा त्यांच्यासाठी फायद्याची ठरलीच, पण राष्ट्रवादीलाही नवसंजीवनी देणारी ठरली हे नक्की.२०१९ मध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांच्या दररोज साधारण तीन ते चार सभा होत होत्या. प्रत्येक सभेत त्यांचा उत्साह दिसत होता ते सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर देत होते. शरद पवार यांनी कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत, तर सोलापूरपासून मुंबईपर्यंत सभांचा धडाका लावला.ईडीसारख्या ब्यादेला शिंगावर घेतलेल्या पवारांचे नाव निवडणुकीच्या आगोदरपासूनच चर्चेत राहिले. काँग्रेससारखा सर्वांत जुना पक्ष राज्यात महाआघाडीत लढत असताना सत्ताधाऱ्यांकडून या निवडणुकीत फक्त राष्ट्रवादी आणि शरद पवारांना लक्ष्य करण्यात आले होते.दिल्लीतून येणाऱ्या भाजप नेत्यांनी पवारांनी काय केले असाही  प्रश्न निवडणुकीत विचारला. त्यांनाही कळून चुकले होते शरद पवार यांच्या शिवाय राजकारण शक्य नाही. त्यानंतर आलेल्या निवडणुकीचे निकालाचे कल बघता शरद पवार आणि महाराष्ट्र हे समीकरण भाजप देखील नाकारू शकणार नाही.

ईडीचा कार्यक्रम –

२०१९ सप्टेंबर मध्ये ईडीने शरद पवार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली होती. यावेळी शरद पवार यांनी स्वतः ईडी कार्यालयात जाणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे राज्यातील भाजपनेते देखील टेन्शनमध्ये आले होते. शरद पवार ईडी कार्यालयात जाणार म्हणजे महाराष्ट्र रस्त्यावर उतरणार हे नक्की झाले असते.मात्रSHARAD PAWAR  यांनी चौकशीला येऊ नये, अशी विनंती ईडी आणि मुंबई पोलिसांनी होती. पोलीस आयुक्तांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होण्याची शक्यता दर्शवली होती. त्यामुळे शरद पवार ईडी कार्यालयात गेले नाहीत. मात्र या दरम्यान शरद पवार यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या.यादरम्यान शरद पवार हे २४ सप्टेंबरपासून ते २७ सप्टेंबरपर्यंत माध्यमांच्या केंद्रस्थानी होते. शरद पवार यांनी न भीता ईडी कार्यालयात जाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या सुचनेचा मान राखत माघार घेतली. कुठलाही गोंधळ होऊ दिला नाही. त्यामुळे प्रगल्भ राजकारणी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.ईडीद्वारे राजकारण्यांवर दबाव निर्माण होत असताना. शरद पवार यांनी थेट ईडीला आव्हान दिले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील जोश निर्माण झाला होता. शरद पवारांनी यशस्वीरित्या स्वत:ला चर्चेत ठेवलं. शरद पवार मायलेज घेऊन गेलेत. याचा फायदा राष्ट्रवादीला निवडणुकीत झाला.दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही, असं भावनिक साद शरद पवारांनी घातली होती आणि नेहमीप्रमाणे आपणच मुरब्बी असल्याचे दाखवून दिले. राजकारणातील भावनिक कार्ड शरद पवारांनी खेळले होते. पक्षाच्या वरीष्ट नेत्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून तळागाळातील कार्यकर्ते जागृत झाले होते. हे देखील शरद पवार यांचे एक शक्तिप्रदर्शन होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *