• Sun. Apr 28th, 2024

नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

Byjantaadmin

Oct 30, 2022

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेले आहेत. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट (Tata Airbus Project) हा नागपूरमध्ये (Nagpur) होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला आहे. अशातच आता आणखी एक नागपूरमध्ये होणारा प्रकल्प हैदराबादला (Hyderabad) गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र, हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळं हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे.

विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सत्तेच्या हव्यासापोटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केलं असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. 2014 नंतरच महाराष्ट्रावर वक्रदृष्टी का? असा सवालही लोंढे यांनी उपस्थित केला आहे. वेगळा विदर्भ करण्याच्या नावावर सत्तेत आलेले लोक, वेगला विदर्भ तर सोडाच पण विदर्भावर किती अन्याय करतात हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात पाण्याची विजेची मुबलकता आहे. तसेच आपल्याकडे कौशल्य असलेलं मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे, तरी प्रकल्प राज्याच्या बाहेर जात असल्याचे लोंढे म्हणाले. प्रकल्प राज्याबाहेर जाणे म्हणजे हा राजकीय करंटेपणा असल्याचे लोंढे म्हणाले. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या जनतेचं सरकारनं नुकसान केल्याचे लोंढे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते बघून दु:ख वाटत असल्याचे सुळे म्हणाल्या.

500 ते 600 कुशल कामगारांचा रोजगार गेला

विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने रराज्यातून काढता पाय घेत आपला विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प हैदराबादलामध्ये वळवला आहे. सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजनाच्या देखभाल दुरुस्तीचा युनिट टाकणार होती. वर्षाला इथे 250 विमानांची इंजन दुरुस्ती व  देखभाल केली जाणार होती.  त्यासाठी कंपनीची 1 हजार 115 कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता. मात्र, हा रोजगार आता गेला आहे. प्रशासकीय विलंबामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती मिळत आहे. कंपनीचे सीईवो यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *