• Sun. May 5th, 2024

पोषक वातावरणानंतरही मॉन्सून पुढे सरकेना; मॉन्सूनबद्दल हवामान विभागाची नवी अपडेट

Byjantaadmin

Jun 19, 2023

देशात मॉन्सून रखडलेल्या अवस्थेत आहे. वातावरण पोषक असतांना देखील मॉन्सूनची प्रगती ही होतांना दिसत नाही. ११ जूनला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आजही कायम आहे.

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र, असे असतांना देखील ११ जून रोजी जी स्थिती होती तीच स्थिती कायम आहे. यामुळे राज्यात अद्याप मॉन्सून हा सक्रिय झाला नसून त्याला आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. मोसमी वारे वेगाने वाटचाल करतील, असे सातत्याने सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ११ जून रोजी मोसमी वाऱ्यांची जी स्थिती आहे, ती रविवारी सायंकाळपर्यंत कायम होती.

११ जून रोजी तळकोकणासह कोल्हापूरच्या काही भागात मोसमी वारे दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. रविवारी सायंकाळपर्यंत मोसमी वाऱ्यांची स्थिती ही जैसे थे होती. तळकोकणातही अद्याप मोसमी पाऊस सुरू झालेला नाही. दरम्यान, होसाळीकर यांनी मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण असून, पुढील तीन दिवसांत मोसमी वारे मध्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखल होतील, असे म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात १५ जून होऊनही अद्याप मॉन्सून सक्रिय झालेला नाही. दरवर्षी ९ जून पर्यंत संपूर्ण राज्यात मॉन्सून सक्रिय होत असतो. यावर्षी मात्र, मॉन्सून लांबला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाअभावी उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आणि देशात रखडलेला मान्सून २३ जूनपासून पुन्हा सुरळीत होऊ शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला असून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास आणखी काही अवधी लागल्याची चिन्हे आहेत.

मध्य भारत, ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. ईशान्य भारत, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागात पुढील तीन दिवसांत अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण भारताच्या दोन्ही किनाऱ्यांवर मोसमी वाऱ्यांच्या ढगांनी दाटी केल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान रविवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एल निनो आणि बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात आणि देशात मॉन्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. राज्यात अद्याप मॉन्सून सक्रिय झालेला नाही. दरवर्षी साधारण १५ जून पर्यंत मॉन्सून राज्य व्यापतो, मात्र अद्याप मॉन्सूनची प्रगती ही दक्षिण कोकणच्या पुढे झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *