• Tue. May 7th, 2024

एसटी बसला भीषण अपघात, २५ प्रवासी गंभीर जखमी

Byjantaadmin

Jun 20, 2023

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील आडूळ परिसरात मालवाहू ट्रकने एसटीला मागून धडक दिली असून त्यात तब्बल २५ प्रवाशांना गंभीर मार लागल्याची माहिती आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्यानंतर आता स्थानिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-सोलापूर महामार्गावरून सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने आडूळ परिसरात एका एसटी बसला जोरदार धडक दिली. ट्रकने धडक दिल्याने चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर भरधाव बस दुभाजकावर जाऊन आदळली. त्यामुळं बसमधील २५ प्रवाशांना गंभीर मार लागला आहे. अपघातात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अपघातानंतर महामार्गावर एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पाचोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.अपघातात जखमी झालेल्यांवर सुरुवातीला आडूळ परिसरातील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर सर्वांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर अवजड वाहनाला भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आता कन्नडच्या आडूळ परिसरात एसटी बसला भीषण अपघात झाल्याने संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता महामार्गावरील वाहतूक पोलिसांकडून सुरळीत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *