• Sun. May 5th, 2024

मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प वेगाने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Byjantaadmin

Jun 21, 2023

मुंबई, :- मराठवाड्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद यांच्या नियामक मंडळाची 81 वी बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सचिव (लाक्षेवी) डॉ. संजय बेलसरे, कार्यकारी संचालक  संतोष तीरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, मुख्य अभियंता जयंत गवळी, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ हे उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सात्रापोत्रा साठवण तलाव, रेपेवाडी साठवण तलाव, केंद्रवाडी साठवण तलाव, सिंदफणा प्रकल्प, विष्णुपुरी प्रकल्प, लेंडी प्रकल्प, कृष्णा मराठवाडा प्रकल्प तसेच नाशिक जिल्ह्यातील  वणी, जोरण या प्रकल्पातील उर्वरित कामांच्या अडीअडचणी सोडवून प्रकल्पाच्या कामास गती देण्याबाबत आवश्यक निर्णय घेण्यात आले. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनविषयक अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने लेंडी प्रकल्पातील क्षतिग्रस्त नागरी सुविधांसाठी सुमारे 31 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. बैठकीमध्ये 44.05 कोटी रुपये अतिरिक्त दायित्वास मंजुरी देण्यात आली.

कृष्णा मराठवाडा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी निरा खोऱ्यातील पाणी भिमा नदीमध्ये आणण्यासाठी आवश्यक 341 कोटी रुपये रकमेस मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. गोदावरी मराठवाडा प्रदेशातील रु. 125.97 कोटी रुपये रकमेचे विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी शासनास सादर करण्यासाठी मान्यता देण्यात आली. पश्चिम वाहिनी पार खोऱ्यातील पाणी गोदावरी नदीमध्ये आणण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणाच्या कामाच्या 29 कोटी रुपये रकमेस मान्यता देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

—–000—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *