• Thu. May 9th, 2024

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख फिक्स झाली हो…; ‘या’ दिवशी होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी

Byjantaadmin

Jun 30, 2023

औरंगाबाद : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? आज होणार की उद्या होणार? या आठवड्यात होणार की पुढच्या आठवड्यात होणार? या महिन्यात होणार की पुढच्या महिन्यात होणार? अशी चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले की या चर्चांना अधिकच बळ मिळतं. सत्तेतील लोकही मोघम उत्तरं देऊन अधिक गूढ निर्माण करत असल्याने विस्ताराची चर्चा अधूनमधून होतच असते. आता पुन्हा या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे-फडणवीस हे दिल्लीत गेले आणि विस्ताराच्या चर्चांना जोर आला. कालच्या दिल्लीवारीत शिंदे-फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखच फिक्स केल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची तब्बल तीन ते चार तास शाह यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर मध्यरात्री हे नेते मुंबईत आले. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरवण्यात आली. तसेच किती मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा? त्यांना कोणती खाती द्यायची? किती पालकमंत्री करायचे? फडणवीस यांच्याकडे कोणती खाती राहतील? मित्र पक्षांचा समावेश आदी मुद्दयावर या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राजभवनावर शपथविधी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या रविवारी किंवा बुधवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सरकारमधील अंतर्गत सूत्रांनीच ही खात्रीलायक माहिती दिली आहे. राजभवनावर छोटेखानी समारंभात हा विस्तार होणार आहे. संभाव्य मंत्र्यांना निरोप धाडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. या विस्तारात शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. महिलांचाही या मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

डच्चू देणार?

गेल्या भेटीत शाह यांनी शिंदे सरकारमधून वाचाळवीर आणि सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार शिंदे सरकारमधील चार मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याचीही चर्चा आहे. पण हे चार मंत्री कोण? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

दोन मंत्रिपद

केंद्र आणि राज्यपाल पातळीवरील मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. कॅबिनेट आणि राज्य मंत्रिपद देण्यात येणार आहे. तर शिंदे गटाकडून या दोन्ही मंत्रीपदासाठी ज्येष्ठ नेत्यालाच संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *