• Fri. May 3rd, 2024

“मराठा-ओबीसी आरक्षणावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर”, दोन मंत्र्यांची नावं घेत खळबळजनक दावा

Byjantaadmin

Nov 9, 2023

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर झालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांना दोन महिन्यांमध्ये मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू असं आश्वासन देत त्यांना उपोषण सोडायला लावलं. त्यानंतर राज्य सरकारने नेमलेल्या समित्या कामाला लागल्या आहेत. ज्या मराठा कुटुंबाकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, काही ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे.

Sanjay Raut

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी ओबीसी नेते करत आहेत. दुसऱ्या बाजूला, ज्यांच्या निजामाच्या काळापासून कुणबी नोंदी आहेत, ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे पुरावे आहेत, त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली आहे. त्यामुळे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे ओबीसी नेते आणि मराठा नेते आमने-सामने येत आहेत. राज्य सरकारमधील काही मंत्री या मुद्द्यावरून एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सातत्याने मराठा आरक्षणाबाबत, मनोज जरांगे पाटलांबाबत वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे भुजबळ मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आहेत. तर राज्यातले ओबीसी काही नेतेही कुणबी जातप्रमाणपत्रास विरोध करत आहेत.दरम्यान, या राज्यातल्या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार  samjay raut यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खासदार राऊत म्हणाले, मराठा-ओबीसी मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर होत आहे, हे तुम्हाला माहिती नाही का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत भांडणं होत आहेत. मला तर वाटतंय की, कॅबिनेट बैठकीत एक-दोन मंत्री मार खातील. मंत्री एकमेकांना मारतील इतकं वातावरण बिघडलं आहे.

खासदार राऊत म्हणाले, आम्हाला आतून ज्या बातम्या मिळत आहेत त्यावरून सांगतो, काही मंत्री एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्र्यांचं नियंत्रण नाही. छगन भुजबळ, साताऱ्याचे शंभूराज देसाई असे खूप जण आहेत. मी इतरही नावं घेऊ शकतो. राज्यावर अशी परिस्थिती यापूर्वी कधीच आली नव्हती.शिवसेना नेते म्हणाले, हा महाराष्ट्र जातीपातीत तोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला यश मिळतंय. कारण राज्यात अत्यंत कमकुवत, दुर्बल आणि अस्थिर सरकार बसलं आहे. मुख्यमंत्र्यांना कोणीच जुमानत नाही. मुख्यमंत्री हे दिल्लीने लादलेले आहेत असल्यामुळे भाजपावाले त्यांना जुमानत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे मराठा-ओबीसी विषयावर सध्या कॅबिनेटमध्ये टोळीयुद्ध सुरू आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *