• Thu. May 9th, 2024

”दौऱ्यासाठी कुणी पैसे मागितले तर याद राखा”, जरांगे पाटलांनी भरला दम

Byjantaadmin

Nov 9, 2023

छत्रपती संभाजी नगरः मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा तिसरा दौरा जाहीर केला आहे. १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा असेल. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याचा शुभारंभ होईल.यावेळी जरांगे पाटलांनी १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये साखळी उपोषण सुरु होणार असल्याचं जाहीर केलं आहे. ते म्हणाले की, शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी कुणीही कुणाकडे पैसे मागू नयेत, तसं लक्षात आलं तर कारवाई केली जाईल.जरांगे पाटील म्हणाले की, समाजातील डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक, अधिकारी, राजकारणी, श्रीमंत, गरीब कुणीही दौऱ्याच्या नावाखाली कुणाला पैसे देऊ नयेत. हा गरीब मराठ्यांचा लढा आहे, तो मराठे लढत आहेत. लोक स्वखर्चाने दौऱ्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे देणाऱ्यांनीही पैसे देऊ नयेत. कारण त्यामुळे आंदोलनाला डाग लागण्याची शक्यता आहे.

आम्ही कुणालाही खर्च मागत नाही- जरांगे

यापूर्वी झालेले दौरे आणि सभा याचा खर्च कधीच कुणाला मागितलेला नाही. त्यामुळे इथून पुढेसुद्धा कुणी पैसे देऊ नयेत. कुणी म्हणेल, पाटील तसं म्हणत असतात.. त्यांना तसंच म्हणावं लागतं. तरी ऐकू नका आणि पैसे देऊ नका. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी असून पैसे कमावण्यासाठी नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *