• Mon. Apr 29th, 2024

लोकसभेपूर्वी उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, रावेरच्या जागेसाठी इच्छुक नेत्याची मुलगी भाजपच्या वाटेवर

Byjantaadmin

Jan 11, 2024

जळगाव : महाविकास आघाडीत ’रावेर’ च्या जागेसाठी आग्रह धरणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी सुरु केली आहे. लवकरच प्रवेश होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दरम्यान, ‘ज्यावेळस ती जाईल त्यावेळी कळेल, असे सांगतानाच तिचा निर्णय ती घेईल’ अशी प्रतिक्रिया डॉ. उल्हास पाटील यांनी ‘मटा’ ला दिली आहे.देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून रावेर लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मागील निवडणुक देखील त्यांनी आघाडीकडून लढविली होती मात्र, आमदार एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर रावेर लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस व राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु झाली आहे.

Ulhas Patil Ketaki Patil

महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादीकडून ’रावेर’ च्या जागेवरुन दावे-प्रतिदावे सुरु असतानाच आता डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. केतकी पाटील यांनी मागील काही दिवसांपासून मतदारसंघात दौरे देखील सुरु केले आहेत. दि. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथे येत असून त्यानंतर डॉ. पाटील यांचा पक्ष प्रवेशाची तारीख नक्की होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

केतकी पाटलांचा बोलण्यास नकार

दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी डॉ. केतकी पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्या समर्थकांनीच याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास केतकी पाटील तयार नसल्याचे सांगितले.भाजप प्रवेशाची चर्चा असली तरी, अद्याप त्या कुठल्या पक्षात गेलेल्या नाहीत. प्रवेश झाल्यावरच त्या कुठल्या पक्षात जातील ते कळेल. दरम्यान, कन्या असल्या तरी त्यांचा निर्णय त्या स्वत: घेतील,असंही माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यानी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *