• Mon. Apr 29th, 2024

राईट हँडला शिंदे, लेफ्ट हँडला फडणवीस, पाठीशी अजितदादा; नाशिकच्या रोड शोमध्ये मोदींच्या कारला ‘ट्रिपल इंजिन’

Byjantaadmin

Jan 12, 2024

नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आगमन झाले. काहीवेळापूर्वीच पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये पोहोचले. त्यानंतर निलगिरी बाग ते रामकुंडापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी रोड शो केला. एरवी रोड शो किंवा अन्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे एकटेच केंद्रस्थानी असतात. मात्र, नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या या रोड शो वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ओपन जीपमध्ये राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचे आधारस्तंभ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी आणि शिंदे-फडणवीस-पवार ही त्रिमूर्ती असे चित्र रोड शो वेळी पाहायला मिळाले. राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जातील, असा राजकीय संदेश या माध्यमातून देण्यात आल्याची चर्चा आहे. या वाहनात मोदींच्या एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, पाठीमागच्या बाजूला अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उभे होते. यावरुन अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेकदा अजित पवार हे भाजपसोबतच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याची चर्चा होते. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते.तत्पूर्वी नाशिकमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन प्रधानमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते. पंतप्रधान मोदी हे काळाराम मंदिरातही जाणार आहेत. तत्पूर्वी मोदींनी रामकुंडाच्या परिसरात प्रतिकात्मक गोदास्नान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठी तपोवन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Prime Minister Narendra Modi Visits Nashik for Road Show | Maharashtra Times

 

मोदींच्या स्वागताला नवनिर्वाचित अधिकाऱ्यांची फौज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रोड शो आणि काळाराम मंदिर दर्शनाच्या माध्यमातून मोदी प्रत्यक्षपणे लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडणार आहेत. नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी नव्या अधिकाऱ्यांची फौज स्वागताला पाहायला मिळाली. प्रधान सचिवपदाची सूत्रं नुकतंच स्वीकारलेले नितीन करीर, नवनिर्वाचित पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला नरेंद्र मोदींच्या स्वागताला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *