• Thu. May 2nd, 2024

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील

Byjantaadmin

Jan 23, 2024

नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी लातूर जिल्हा प्रशासन सज्ज !

जिल्ह्यात प्रत्यक्ष सर्वेक्षणाला आजपासून होणार प्रारंभ

·       तालुका पातळीवर प्रगणक, पर्यवेक्षक यांना सर्वेक्षणाचे प्रशिक्षण

·       सर्वेक्षणासाठी 8 हजारपेक्षा अधिक प्रगणक, 600 पेक्षा अधिक पर्यवेक्षक

लातूर,  (जिमाका):  राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी लातूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणाची कार्यवाही पूर्ण झाली असून मंगळवार (दि. 23) पासून प्रत्यक्ष घरोघरी जावून सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत.

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी लातूर जिल्ह्यात सुमारे 8 हजार 297 प्रगणक नेमण्यात आले आहेत. लातूर तालुक्यासाठी एक हजार 9, लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात एक हजार 52, रेणापूर तालुक्यात 482, औसा तालुक्यात एक हजार 400, निलंगा तालुक्यात एक हजार 252, उदगीर तालुक्यात एक हजार 105, अहमदपूर तालुक्यात 708, शिरूर अनंतपाळ तालुक्यात 199, देवणी तालुक्यात 262, जळकोट तालुक्यात 366 आणि चाकूर तालुक्यात 462 प्रगणक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यात ठराविक प्रगणक राखीव असून उर्वरित प्रगणक प्रत्यक्ष सर्वेक्षणाची कार्यवाही करणार आहेत.

सर्वेक्षणाच्या कामासाठी जिल्ह्यात सुमारे 611 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. लातूर तालुक्यात 68, लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात 52, रेणापूर तालुक्यात 28, औसा तालुक्यात 83, निलंगा तालुक्यात 139, उदगीर तालुक्यात 99, अहमदपूर तालुक्यात 49, शिरूर अनंतपाळ तालुक्यात 18, देवणी तालुक्यात 18, जळकोट तालुक्यात 25 आणि चाकूर तालुक्यात 35 जणांवर पर्यवेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच सर्वेक्षणाच्या कामकाजात समन्वय ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक नोडल अधिकारी आणि एक सहायक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

सर्वेक्षण अचूक, परिपूर्ण होण्यासाठी दोन टप्प्यात प्रशिक्षण

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी प्रगणक, पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. 23 जानेवारीपासून प्रगणक घरोघरी जावून सर्वेक्षणाला सुरुवात करतील. सर्वेक्षणासाठी मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून नागरिकांनी सांगितलेली माहिती प्रगणक या मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये भरणार आहेत. सर्वेक्षणाची कार्यवाही अचूक, परिपूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना प्रशिक्षणाद्वारे या मोबाईल अॅप्लिकेशनची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा आणि तालुकास्तर असे दोन टप्प्यात हे प्रशिक्षण पार पडले. रविवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षणात जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स यांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच दुसऱ्या टप्प्यात सोमवारी प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना प्रत्येक तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.

सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून याबाबतचे दोन्ही टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मंगळवारपासून प्रगणक घरोघरी जावून सर्वेक्षणाला प्रारंभ करणार आहेत. जिल्ह्यातील सर्वेक्षण अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना नागरिकांनी आवश्यक माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *