• Wed. May 1st, 2024

निलंगा मतदारसंघात रेल्वे आणल्याशिवाय सत्कार घेणार नाही   खा. सुधाकर शृंगारे यांचा संकल्प शिरूर अनंतपाळ येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा  

Byjantaadmin

Apr 18, 2024

निलंगा मतदारसंघात रेल्वे आणल्याशिवाय सत्कार घेणार नाही   खा. सुधाकर शृंगारे यांचा संकल्प शिरूर अनंतपाळ येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा  

निलंगा/प्रतिनिधी ः जिल्ह्याचे नेते तथा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघात विकासात कमतरता ठेवलेली नाही. या मतदारसंघात रेल्वेची आवश्यकता असून त्या दृष्टीने पाठपुरावा सुरू आहे. जोपर्यंत निलंगा मतदारसंघातून रेल्वे धावणार नाही तोपर्यंत या भागात सत्कार स्वीकारणार नाही, असा संकल्प भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर श्रृंगारे यांनी केला.
 शिरूरअनंतपाळ येथील अनंतपाळ मंगल कार्यालयात पार पडलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात खा. शृंगारे बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे मंत्री संजय बनसोडे, भाजपा युवानेते अरविंद पाटील निलंगेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, उपजिल्हा प्रमुख  सुधीर पाटील, राष्ट्रवादीचे पंडीतराव धुमाळ, अ‍ॅड. संभाजी पाटील, जयश्री पाटील, नगराध्यक्षा माया धुमाळे, संतोष शेटे, रयत क्रांतीचे शिवाजी पेठे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, लोकसभा प्रमुख राहूल केंद्रे, भारत चामे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना खा. सुधाकर श्रृंगारे म्हणाले की, मागील पाच वर्षात लातूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. केंद्र सरकारने लातूरसाठी विविध योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी लातूरसाठी दिलेला आहे. यातून महामार्ग, हर घर नल, प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या महत्वाकांक्षी योजना राबविण्यात आल्या आहेत. यापुढेही विविध योजनांचा लाभ लातूर मतदारसंघातील नागरिकांना मिळणार आहे. त्यात रेल्वेचा विषय अग्रभागी असून भविष्यात लातूर मतदारसंघात महामार्गाप्रमाणेच रेल्वेचेही जाळे निर्माण केले जाईल, असे ते म्हणाले.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना ना. संजय बनसोडे म्हणाले की, विकास काय असतो हे गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. आज समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी देश कणखरपणे उभा असून ही विकासगंगा अशीच कायम पुढे वाहत रहावी म्हणून मोदीजींना पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केलेे.
भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले की, देशाचे भविष्य ठरविणारी ही निवडणुक आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी योग्य विचार करून आपले मत महायुतीच्या उमेदवाराला द्यावे. आपले मतदान देशाच्या विकासासाठी असेल याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असेही निलंगेकर म्हणाले.
देश सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे आहे, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी व्यक्त केले. मागील दहा वर्षात देशात एकही अतिरेकी हल्ला झाला नाही. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे व सर्वांना समान न्याय देणारे नेतृत्व आपल्या देशाला लाभले आहे. नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्याची संधी आपल्याला लाभली आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागावे, असे आवाहनही माने यानी केले.
या मेळाव्यास निलंगा विधानसभा निवडणूक प्रभारी दगडू सोळुंके, शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, जिल्हा संघटनमंत्री संजय दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, शहराध्यक्ष संतोष शेट्टे, गणेश धुमाळे, गणेश सलगरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गुंडेराव  जाधव, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष विकास शिंदे, जयश्रीताई पाटील, नगराध्यक्ष मायावती धुमाळे आदींसह पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *