• Thu. May 2nd, 2024

काँग्रेसला एमआयएमची भक्कम साथ ?, उमेदवाराची माघार; काय घडतंय सोलापुरात?

Byjantaadmin

Apr 19, 2024

राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात पाच जागांवर मतदान होत आहे. तर सोलापुरात तिसऱ्या टप्प्यात म्हणजे येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. सोलापुरात भाजप, काँग्रेस, वंचित आघाडी आणि एमआयएम अशी चौरंगी लढत होणार होती. तिन्ही पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले होते. एमआयएमने उमेदवारांची यादीही तयार केली होती. पण एमआयएमने उमेदवार जाहीर करण्याआधीच आपला उमेदवार मागे घेतला आहे. एमआयएमने हा निर्णय घेऊन अप्रत्यक्षपणे काँग्रेसला भक्कम साथ दिली आहे. त्यामुळे आता सोलापुरात तिरंगी लढत होणार आहे. एमआयएमने काँग्रेसला साथ दिल्याने या मतदारसंघातील काँग्रेसचं पारडं जड झालं आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने माघार घेतली आहे. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी या बाबतची माहिती दिली आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशानंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे. संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात संविधान वाचावणाऱ्या पार्टीला समर्थन देणार असल्याचेही सुतोवाचही एमआयएमने केले आहे. तसेच एमआयएने सोलापुरात काँग्रेसला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. मागच्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएमच्या युतीचा काँग्रेसला मोठा फटका बसला होता.

जाहीर पाठिंबा नाही

आम्ही सोलापुरात एमआयएमचा उमेदवार देण्याची तयारी केली होती. आमच्याकडे दहा उमेदवारांची यादी तयार होती. माजी आमदार रमेश कदम यांनी आमच्यासोबत संपर्क साधला होता. ते लढण्यासाठी इच्छुक होते. आमची बोलणी झाली. पण ही बोलणी पुढे जाऊ शकली नाही. यावेळी आम्ही समाजातील ज्येष्ठांशी संवाद साधला. तेव्हा संविधान वाचवण्यासाठी उमेदवार देऊन मतांचं विभाजन करू नये असं प्रत्येकाचं म्हणणं पडलं. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन आम्ही उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही जाहीरपणे कुणाला पाठिंबा देणार नाही, असंही शाब्दी यांनी सांगितलं.

आंबेडकरांमुळे पराभव

दरम्यान, गेल्यावेळी एमआयएम आणि वंचितची आघाडी झाली होती. या निवडणुकीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणुकीला उभे होते. आंबेडकर हे मैदानात असल्याने काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांना 2019च्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत आंबेडकर यांनी 1 लाख 70 हजार मते घेतली होती. त्यामुळे शिंदे यांचा एक लाख 57 हजार मतांनी पराभव झाला होता. आंबेडकर लढले नसते तर या निवडणुकीत शिंदे सहज विजयी झाले असते. आता एमआयएमने उमेदवार न दिल्याने ही मते काँग्रेसच्या पारड्यात जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *