• Sat. May 4th, 2024

मतदानाचा नवा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करणार – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Apr 21, 2024

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध असेशिएशनला जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन !

मतदानाचा नवा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करणार – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

• मतदार जागृतीसाठी स्वीप कक्षाचा उपक्रम

लातूर,: लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून या क्षेत्रातही नवा लातूर पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेवून आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप कक्षाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत लातूर जिल्ह्यातील लातूर जिल्हा ट्रव्हल्स असोसिऐशन, डॉक्टर्स, पॅथालॉजी, व्यापारी, ऑटोरिक्षा चालक, लघुउद्योग यासह विविध व्यापारी संघटना, असोसिएशनच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी संवाद साधला. तसेच प्रत्यके असोसिएशनच्यावतीने अभिनव कल्पना राबवत मतदान वाढीसाठी पर्यंत करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी या सुसंवाद बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सर्वांना मतदानाची शपथ देण्यात आली.

सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका आयरे, स्वीपचे नोडल अधिकारी रामदास कोकरे व नागेश मापारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांची यावेळी उपस्थिती होती.

लातूर पॅटर्नची शैक्षणिक क्षेत्रातील ओळख ही सर्वशृत आहे. मतदानामध्येही लातूरचा नवा पॅटर्न तयार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सुमारे 62 टक्के होती. यावेळी सर्वाधिक मतदानाची टक्केवारी लातूर जिल्ह्यात असावी, यासाठी प्रयत्न सुरु आहे. लातूरकर हे वेगळे सामाजिक भान जपणारे आहेत. प्रतिभाशाली व कल्पक आहोत. आपल्या या वेगळ्या जाणिवेचा व कल्पकतेचा वापर त्यांनी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी करावा. यासाठी ‘व्होट फॉर लातूर’ ही चळवळ निरपेक्ष भावनेने चालवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनीही उपस्थितांना आवाहन करत जिल्हा प्रशासना अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील अधिकाऱ्यांनी मतदान जागृतीवाढीसाठी त्या-त्या विभागांतर्गत येणाऱ्या आस्थापनांकडून उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. तसेच जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी तथा नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांनी शासकीय कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वीप उपक्रमाची माहिती दिली.

याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत ट्रव्हल्स असोसिऐशनने मतदानासाठी येणाऱ्या बाहेरगावाहून येणाऱ्या लातूरकरांना प्रवासी भाड्यात 10 टक्के सवलत देण्यात येईल, असे सांगितले. मतदानासाठी लातूर येथे येताना 5 व 6 मे रोजी आणि मतदान करून परत जाताना 7 व 8 मे रोजी ही सवलत देण्यात येईल. येताना प्रवाशांनी लातूरचे रहिवासी असल्याचा पुरावा दाखविणे आणि परत जाताना मतदानाची बोटावरील शाई दाखविणे आवश्यक असल्याचे असोसिऐशनने सांगितले.

लातूर पॅथालॉजी असोसिऐशनच्यावतीनेही मतदान करणाऱ्या नागरिकांना बिलामध्ये 10 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ऑटोरिक्षा चालक असोसिऐशन यांनी मतदानादिवशी दिय्वंग मतदारांना ने-आण करण्यासाठी 10 ऑटोरिक्षा विनामुल्य उपलब्ध करून देण्याची हमी दिली. तसेच या अनुषंगाने इतरही व्यापारी संघटना, असोसिऐशन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजाविणाऱ्या लातुकरांसाठी विविध सवलती देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *