• Fri. May 3rd, 2024

“माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा…”, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडेंना इशारा

Byjantaadmin

Apr 20, 2024

मराठा आरक्षणाच्या मागणीवरूनही बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अप्रत्यक्षपणे फटकारले. कितीही उपोषणे, भाषणे केली तरी अशा पद्धतीने आरक्षण मिळत नसते, त्यासाठी विशिष्ट पद्धत असून सामाजिक मागासलेपण सिद्ध झाले तरच आरक्षण मिळू शकेल, अशा शब्दांत त्यांनी जरांगे यांना सुनावले होते. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी ज्या पाटोदा तालुक्याच्या परिसरात आरक्षण, जात या मुद्यावरून भाषणे केली त्याच परिसरात दोन दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांचाही दौरा झाला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे यांना माध्यमांनी याबाबत विचारले असता त्यांनी पकंजा मुंडे यांना थेट इशारा दिला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

पंकजा मुंडे यांच्या विधानाविषयी प्रश्न विचारला असता मनोज जरांगे म्हणाले की,pankaja munde यांचे विधान मी ऐकलेले नाही. पण पंकजा मुंडे यांना आणि त्यांच्या समाजाला कधीही विरोधक म्हणून मानलेले नाही. मी त्यांचे विधान स्वतः ऐकतो आणि मग त्यावर प्रतिक्रिया देतो. पण त्यांना याच कडेला यायचे असेल तर मराठ्यांचाही नाईलाज होईल.“मराठा आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा की राज्य सरकारचा? हे मराठ्यांना चांगले माहीत आहे. हे पंकजा मुंडे यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. पण मराठा समाज आणि आमच्या उपोषणाविषयी त्यांना हिणवून जर बोलायचे असेल तर त्यांनी त्यांचा चष्मा काढून एकदा डोळसपणे पाहावे. माझ्या उपोषणामुळेच समाजाला अर्धे आरक्षण मिळाले आहे आणि यापुढेही उपोषण आणि सभांमुळेच राहिलेलं आरक्षणही मिळेल. पण आम्हाला टक्कर देण्याचा प्रयत्न करू नका. मी जर टक्कर द्यायला लागलो तर मी कुणालाही सोडत नाही. मी तुमच्या वाटेला गेलेलो नाही, तुम्ही माझ्या वाटेवर येऊ नका”, असा स्पष्ट इशाराच मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडे यांना दिला.माझे राज्यभर दौरे सुरु आहेत. गावखेड्यातून मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. समाजाचा राज्यकर्त्यांविषयी प्रचंड रोष आहे. हा असंतोष असताना राज्यकर्ते मात्र कुठल्या विश्वात आहेत? हे कळायला मार्ग नाही, असेही मनोज जरांगे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *