• Sat. May 4th, 2024

धाराशिवमध्ये वेगळंच वारं, डॉ. मंत्र्यांचा नाराज पुतण्या नॉट रिचेबल; महायुतीचं ‘ऑपरेशन’?

Byjantaadmin

Apr 21, 2024

धाराशिव : धनंजय सावंत अद्यापही नाराज असून ते महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ कुठेही मतदारसंघात दिसून येत नाहीत. ते अध्याप ही नॉट रिचेबल असल्यामुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. १९ एप्रिल रोजी महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून हजर होते. यावेळी आरोग्य मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा मतदारसंघ शिवसेनाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याची खदखद व्यक्त केली. तसेच मी छातीचा कोट करून अर्चना पाटील यांना निवडून आणेल असंही सांगितलं. मात्र त्यांचे पुतणे धनंजय सावंत हे कुठे दिसून आले नाही. तसेच सावंत समर्थक यांनी यावेळी दांडी मारल्याचे दिसून आले.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत होते. सुरुवातीपासूनच धनंजय सावंत हे या मतदारसंघासाठी इच्छूक असल्यासमुळे त्यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली होती. चांदा ते बांदा, वाडी, वस्ती, शहर या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. तसेच मतदारांना देखील भेटी दिल्या. आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघातून इच्छूक असल्याचे त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे तसेच चुलते डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली. परंतु ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी या जागेवर हक्क सांगितला आणि ही जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतली. यामुळे सावंत गट प्रचंड आक्रमक पाहिला मिळाला.प्रत्येक गावात अर्चना पाटील यांना विरोध झाला. तसेच या निर्णयाच्या विरोधात निर्देशने देखील करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले. तर प्राथमिक सदस्यतेची होळी केली. ९ एप्रिल रोजी धनंजय सावंत व त्यांचे हजारो समर्थक यांनी मुंबई गाठली. येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन घेतलेला निर्णय बदला, अशी मागणी केली आणि धनंजय सावंत यांना उमेदवारी द्या अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.योग्यवेळी संधी आल्यास आपण जरूर सन्मान करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय सावंत आणि त्यांच्या समर्थकांना दिली. नाराज असलेले धनंजय सावंत त्या दिवसापासून मतदार संघात फिरकलेच नाहीत. तर सावंत समर्थक यांनी अर्चना पाटील यांच्या प्रचारातून अंग काढल्यामुळे भूम, परंडा, वाशी यातील तालुक्यात फटका बसण्याची दाट शक्यता आहे. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी सत्तांतर घडवण्यासाठी दीडशे बैठका घेऊन सत्तांतर घडवले आणि त्यांनी त्यात यश देखील मिळवले आहे. परंतु स्वतःच्या पुतण्याला धारशिव लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यास त्यांना अपयश आल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. तानाजी सावंत यांचे राजकीय वजन कमी झाली की काय? अशीही चर्चा मतदारांमध्ये आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज धनंजय सावंत यांची नाराजी दूर करतात का? हे पुढील काही दिवसात दिसून येईल. धनंजय सावंत यांचा कार्यकर्ता वर्ग मोठा असल्यामुळे त्या कार्यकर्त्यांची मदतच महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना होऊ शकते. परंतु सावंत समर्थक नाराज असल्यामुळे महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील यांना धनंजय सावंत यांची नाराजी दूर करून प्रचारात सहभागी करावी लागेल हे मात्र नक्की. धनंजय सावंत हे काय निर्णय घेतात हे पुढील काही दिवसात दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *