• Mon. May 6th, 2024

‘मराठा आरक्षण विरोधकांना निवडणुकीत पाडा’; जरांगेंनी मतदान करायला गेल्यावर मतदारांना काय सल्ला दिला?

Byjantaadmin

Apr 26, 2024

महाराष्ट्रातील ८ लोकसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ८ लोकसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण विरोधकांना निवडणुकीत असं पाडा, की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मतदारांना आज केलं आहे.निवडणुकीत आपले उमेदवार नसले, तरी पाडण्यातही आपला विजय असेल, असंही पुढे मनोज जरांगे म्हणालेत. ते जालन्यामध्ये बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, आज परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान असल्यामुळे जरांगे हे रुग्णवाहिकेतून त्यांच्या मूळ गावी गोरी गंधारी या गावी आले होते. लोकशाहीचा हक्क बजावल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

मराठा विरोधकांना निवडणुकीत पाडा

माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, “मी मराठा मतदारांना सांगितलं होतं की कोणालाही मतदान करा. कारण समाजाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. सगेसोयरे अध्यादेशाच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच या बाजूने असणाऱ्यांना मराठा समाजाने सहकार्य करायला हवं”.

“जरी आपण उमेदवार दिलेला नाही, पाठिंबाही दिला नाही. पण पाडण्यातही आपला विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. उभाच राहावं किंवा उमेदवार द्यावा असं काही नाही, पाडण्यातही खूप मोठा विजय आहे. यावेळेस पाडणारे बना”, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *