• Mon. May 6th, 2024

आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजनांसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Apr 26, 2024

आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजनांसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा; यंदा सरासरी जास्त पावसाचा अंदाज

तलाव, जुने पुलांचे सर्वेक्षण करून दुरुस्तीच्या सूचना

लातूर, दि. २६ : मॉन्सून काळात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आवश्यक उपाययोजना हाती घेण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. सर्व विभागांनी आपली आपत्कालीन प्रतिसाद कार्यपद्धती (एसओपी) अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबसाहेब मनोहर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. एच. वडगावे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमरसिंग पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. आर. सावंत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सहायक अर्चना बिसोई यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

मॉन्सूनपूर्वी जिल्ह्यातील सर्व तलावांची संबंधित विभागांनी पाहणी करून सांडवा, भिंत यांची तपासणी करावी. तसेच आवश्यक ठिकाणी दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व जुन्या पुलांचे आणि रस्त्यांचे सर्वेक्षण करून धोकादायक पुलांची यादी तयार करावी. तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. धोकादायक तलाव, पूल यांची माहिती तालुकास्तरीय यंत्रणांनी संबंधित तहसीलदार यांना उपलब्ध करून द्यावी. नदीवरील बॅरेज आणि इतर प्रकल्पांमधून पाणी सोडताना त्याबाबतची पूर्वकल्पना संबंधित तहसीलदार यांना देण्यात यावी. पूर प्रवण क्षेत्रात आवश्यक उपाययोजना कराव्यात. शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

पूरप्रवण गावांतील नदीकाठांची पाहणी करून नदी प्रवाहात झालेली अतिक्रमणे हटवावीत. तसेच  सर्व विभागणी आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्याची कार्यवाही करावी. पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरणारे साथीचे रोग, सर्पदंश आदी उपचारासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्रात पुरेसा औषधसाठा ठेवावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.उपविभागीय व तालुकास्तरावर उपलब्ध बचाव साहित्याची सज्जता ठेवावी. तहसीलदारांनी नदीकाठच्या गावातील पोहणाऱ्या व्यक्तींची अद्ययावत यादी सादर करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिल्या.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पूरप्रवण गावांची माहिती दिली. तसेच एप्रिल ते मे आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान जिल्ह्यात वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *