• Thu. May 9th, 2024

घटनाकारावर अन्याय करणार्‍या काँग्रेसला धडा शिकवा ः माजी मंत्री दिलीप कांबळे

Byjantaadmin

Apr 27, 2024

घटनाकारावर अन्याय करणार्‍या काँग्रेसला धडा शिकवा ः माजी मंत्री दिलीप कांबळे
 निलंगा/प्रतिनिधी : देशातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, महिला, दीन -दलित, शोषित पीडितांना घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय मिळवून दिला. त्यांना सन्मानाने जगण्याची शिकवण दिली. त्यांच्या विद्वत्तेमुळे काँग्रेसवाल्यांनी कायम त्यांच्यावर अन्याय केला. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवा. डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व शिकवणुकीचा सन्मान करणारे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांना मतदान करा, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी केले.


निलंगा येथील केतकी मंगल कार्यालयात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, मनसे, रासप, महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ अनुसूचित जाती जमातीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री कांबळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर तर व्यासपीठावर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, प्रा. पंडित सूर्यवंशी, माजी समाज कल्याण सभापती संजय दोरवे, शेषराव ममाळे, आरपीआयचे अंकुश ढेरे, सुधीर पाटील, संतोष वाघमारे, बालाजी गवारे, उद्धव गायकवाड, दिलीप गायकवाड, अनिल कांबळे, संजय हलगरकर, दयानंद कांबळे, भगवान जाधव, कुमोद लोभे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी मंत्री कांबळे म्हणाले की, लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या माध्यमातून आपणाला विकास पुरुष नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी कमळाला मतदान करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात दिल्लीत व्हावा, अशी या देशातील तमाम आंबेडकरी अनुयायांची भावना होती.परंतु काँग्रेसवाल्यांनी हे केले नाही. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्याची सद्बुद्धी काँग्रेसवाल्यांना झाली नाही. नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोठ्या सन्मानाने बाबासाहेबांचा फोटो सेंट्रल हॉलमध्ये लावला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच चहा विकणारा, सर्वसामान्य गरीब कुटुंबातून आलेल्या माझ्यासारख्या माणसाला देशाचा पंतप्रधान होता आले. पंतप्रधान मोदी हे कधीच घटना बदलणार नाहीत आणि बदलुही देणार नाहीत.
काँग्रेसवाले विकासाचे मुद्दे नसल्यामुळे जनता आणि मतदारांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या मतदारसंघातील दलित बांधवांनी अशा लोकांना निवडणुकीत धडा शिकवावा.
कांबळे म्हणाले की, डॉ. आंबेडकर देशाच्या वीज बोर्डावर असताना शेतीला, उद्योगाला, घराला वीज देण्याचे काम त्यांनी केले. पंजाबला सुजलाम सुफलाम करून देशातील मोठ्या धरणाची संकल्पना त्यांनीच मांडली. मुस्लिम समाजाला शिक्षणापासून दूर ठेवण्याचे पाप काँग्रेस सरकारने केले. मोदीजींनी गेल्या दहा वर्षात मुस्लिम महिलांसाठी तीन तलाक सारखा कायदा रद्द करून त्यांचा सन्मान केला आहे. मुस्लिम समाजाला शिक्षण देण्याचे कामही मोदी सरकार करत आहे. लंडन येथील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. आंबेडकर यांचे शिक्षण घेत असतानाचे घर राज्य शासनाने विकत घेऊन त्या ठिकाणी स्मारक बांधले. केंद्र सरकारने इंदू मिलची जागा राज्य शासनाला देऊन डॉ. आंबेडकर यांचे मुबंईत स्मारक उभारण्याचे काम भाजप सरकारने केले. त्यामुळे येणार्‍या सात तारखेला उमेदवार भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना मतदान करून नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करावे, असे आवाहनही माजी मंत्री कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वाघमारे, सूत्रसंचलन हानेगावे तर आभार दयानंद कांबळे यांनी मानले

संभाजीरावांसारखा मित्र मिळणे भाग्यच
माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर या मतदारसंघाची जनतेची तळमळ असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या सारखा मित्र लाभणे हे माझे भाग्यच आहे. अशा शब्दात संभाजीरावांची स्तुती माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *