• Fri. May 10th, 2024

भारताला विश्‍व मित्र करण्यासाठी योगदान द्या- भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे

Byjantaadmin

Apr 27, 2024

भारताला विश्‍व मित्र करण्यासाठी योगदान द्या भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे
लातूर/प्रतिनिधी : जागतिक पातळीवर आज भारताचा दबदबा वाढलेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असून सर्वच बाबतीत जग भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहेत. वैश्‍विक पातळीवर जी-20 परिषद जगाचे नेतृत्व करीत असून या परिषेदेचे नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळाली आहे. या माध्यमातून भारत विश्‍वाचा सच्च मित्र म्हणून पुढे येत असून त्यासाठी आपण सर्वांनीही योगदान देण्याची आवश्यकता आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन व्यक्त करा, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले.
तावडे यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी 11 वाजता दयानंद सभागृहात विकसित भारत 2047 हा संवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तावडे बोलत होते. मंचावर लोकसभा संयोजक माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी खा. सुनिल गायकवाड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शहर विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे, राष्ट्रवादीचे अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, सुधीर धुत्तेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी मार्गदर्शन करताना विनोद तावडे म्हणाले की, 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्त विकसित भारत 2047चे व्हिजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेले आहे. त्यादृष्टीने कामकाज सुरू आहे. मागील दहा वर्षात नेमका काय बदल झाला हे देखील तावडे यांनी स्पष्ट केले. 2014 पर्यंत देशात दररोज केवळ 12 कि.मी. रस्त्यांची निर्मिती होत होती. हे प्रमाण आता 28.6 कि.मी. एवढे आहे. त्याकाळात परकीय गुंतवणूकीत मोठी वाढ झाली. स्वातंत्र्यापासून देशातील 18 हजार 452 गावांना वीज मिळाली नव्हती. मोदी सरकारने ही सर्व गावे प्रकाशमान केली. 2014 पूर्वी 2650 टन एवढे खाद्य उत्पादन होते ते आज 3500 टन एवढे वाढले असल्याचे तावडे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मागच्या दहा वर्षात महिलांची कार्यक्षमता व भागिदारीत वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी केवळ 5 टक्के महिला कंपन्यांच्या संचालक व विश्‍वस्तपदी होत्या. हे प्रमाण आज 20 टक्के आहे.पंतप्रधान आवास योजनेतून सामान्य नागरिकांना घरे मिळाली. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. देशातील तरुणांसाठी पूर्वी केवळ 16 आयआयटी महाविद्यालये होती. ती आता 23 झाली आहेत. देशातील जनतेच्या आरोग्याची काळजी मोदी सरकारने घेतली असून आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आर्थिक व्यवहार पारदर्शक झाले असून डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून जनतेने भरलेल्या कररुपी पैशाला योग्य न्याय सरकारने दिला असल्याचे तावडे म्हणाले.
तावडे यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. त्यामुळे असंख्य लोकांनी सबसिडी घेणे बंद केले. यातून दुर्बल घटकांना गॅस देता आला. मोफत काही मिळेल या मानसिकतेतून लोकांना बाहेर काढून आर्थिक सक्षम करा, असा संदेश नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. सध्याच्या तरुणाईला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्याची संधी मिळाली नाही, पण देशाला विश्‍वमित्र करण्यासाठी ते योगदान देऊ शकतात. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन द्या. लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले. आ. संभाजी पाटील हे लातुरकरांचे चांगले वकील असून त्यांच्या नेतृत्वात या निवडणुकीत महायुतीचा विजय निश्‍चित असल्याचेही तावडे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आ. निलंगेकर म्हणाले की, मी स्वतःसाठी काही मागितले नाही, पण लातूरकरांसाठी पाणी आणि केंद्रीय विद्यापीठ ही आपली प्रमुख मागणी आहे. आजपर्यंत विरोधी पक्षाने पाण्यासाठी लातुरकरांना झुलवत ठेवले पण पाणी मिळालेच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी तावडे यांचे ऐकतात त्यामुळे आपण मोदी यांच्याकडे लातुरकरांची वकिली करावी. लातूर येथे आयआयटी महाविद्यालय स्थापन करावे, अशा मागण्याही आ. निलंगेकर यांनी केल्या.
काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नसल्यामुळे आपण त्या पक्षाच्या बाहेर पडलो, असे मत अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शैलेश गोजमगुंडे तर आभार प्रदर्शन सुधीर धुत्तेकर यांनी केले. या मेळाव्यास डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, अविनाश कोळी, रागिनीताई यादव, स्मिता परचुरे, प्रेरणा होनराव, अजित पाटील कव्हेकर, डॉ. संजय शिवपुजे, जगदीश कुलकर्णी, सुहास सारडा, अंजली टेंभुर्णीकर,मिना गायकवाड, सुनिल लोहिया, गणेश गोमचाळे यांच्यासह मतदारसंघातील प्रतिष्ठीत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *