• Sun. May 5th, 2024

आज जागतिक हृदय दिन

Byjantaadmin

Sep 29, 2022

२९ सप्टेंबर

आज जागतिक हृदय दिन

आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखाद्या विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाय योजना करावी याची माहिती जनतेपुढे मांडणे महत्वाचे ठरते. इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाकू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्यागोष्टी ताबडतोब बंद करायला हवे.

हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी. हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा, तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.

जरा हृदयात डोकाऊन बघा, आत शिरा. आतील भिंती चाचपडून पाहा. तुम्हाला दिसतील विविध रंगाच्या एकमेकात मिसळलेल्या छटा. सार्‍याच भिंतीवर असतील रेशमी मुलायम स्पंदन आणि स्नेहमयी भावाक्षरे. तेंव्हा तुम्हाला कुठेतरी चुकचुकल्या सारखं वाटेल, काहीतरी हरवलेलं वाटेल, तेच ते. इथे तर कुठेही दिसत नाही क्रोधाचे तप्त प्रदेश, द्वेषाचे काटेरी रस्ते, मोहमयी झाडाचे पुंजके, स्वार्थ वादाच्या इमारती. कुठेच कसे नाहीत हिंसक हात? अरे, हे तर सारं बाहेरच राहिलं. इथे तर विशुद्ध प्रेमाच्या आविष्कारा शिवाय काहीही नाही आणि मग हरवलेल्या माणूसपणाचा शोध लागेल. म्हणून हृदयावर प्रेम करा. हृदयातील हा बंदिस्त ठेवा बाहेरच्या जगात वाटा. हृदयासारखं व्हा. काळजी घेणारं, निकोप आणि आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीत सहभागी होऊ या !

जागतिक हृदय दिवसाच्या हृदयापासून शुभेच्छा !

संकलन
ए.आर.मौजन

साभार
सोशल मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *